खांबाळेची देवी आदिष्टी

एकनाथ पवार
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

जागर नवरात्रोत्सवाचा...

पश्‍चिमेकडे सालवा डोंगर आणि पूर्वेकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले गाव म्हणजेच खांबाळे. या गावचे ग्रामदैवत श्री देवी आदिष्टी हे आदिशक्तीचे रूप मानले जाते. पारंपरिक पद्धतीने साजरे होणारे उत्सव आणि त्यांना नव्या पिढीची मिळत असलेली साथ यामुळे येथील सर्व उत्सवांना नवी झळाळी प्राप्त झाली आहे.

वैभववाडी-फोंडा मार्गावर खांबाळे हे गाव आहे. या गावचे ग्रामदैवत श्री देवी आदिष्टी आहे. या देवीचे मंिदर याच मार्गालगत आहे. पुरातन मंदिरांचा २००४ मध्ये ग्रामस्थांनी जीर्णोद्धार केला. आकर्षक कळस हे या मंदिराचे खास वैशिष्ट्य. आदिष्टी मंदिराच्या डाव्या बाजूला श्री देव विठ्ठलाईचे देखणे मंिदर आहे तर डाव्या बाजूला आकर्षक असे श्री देव मिराशीचे मंदिर आहे.

मंदिराच्या सभोवताली वर्षानुवर्षाची मोठी झाडे आहेत. त्यातच नव्या पिढीने मंदिरालगत विविध जातींची शोभीवंत झाडे लावली आहेत. त्यामुळे मंदिर परिसरामध्ये एक आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळते. मंदिरामध्ये वैभववाडी-फोंडा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता पाणपोई बसविण्यात आली आहे. या मार्गावरून जाणारे शेकडो लोक विश्रांतीकरिता येथे थांबतात.

श्री देवी आदीष्टीमंदिरामध्ये अनेक उत्सव साजरे होतात. यामध्ये नवरात्रोत्सव, शिमगोत्सव, सप्ताह, त्रिपुरा पौर्णिमा, अक्षय्यतृतीया उत्सव, असे अनेक उत्सव जोशात साजरे केले जातात. नवरात्रोत्सवाची सांगता विजयादशमीला होते. या दिवशी देवीची ओटी भरण्यासाठी मोठी गर्दी होते. खणानारळाने ओटी भरली जाते. शिमगोत्सवाला ओटी भरण्याकरिता माहेरवाशिणी मोठ्या प्रमाणात येत असतात. मंदिरामध्ये कीर्तन, प्रवचन, भजन, अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्री देवी आदिष्टी हे आदिशक्तीचे रूप मानले जाते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sindhudurg news khambale devi aadishti