मुणगेची देवी भगवती

मुणगेची देवी भगवती

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थानांमध्ये मुणगेच्या (ता. देवगड) श्री देवी भगवती देवस्थानचा समावेश होतो. या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, विविध सण-उत्सव होतात. मुणगे हे निसर्ग संपन्न गाव आहे. श्री भगवती देवीचे मंदिर गावाच्या मध्यभागी व रस्त्याला लागूनच असल्याने एसटी बसमधून प्रवास करणारा प्रवासीसुद्धा मंदिरासमोर बस येताच श्रद्धेने नमस्कार करतो.

भगवती मंदिरात प्रवेश केल्यावर भाविकांचे मन शांत व प्रसन्न वातावरणात मोहरून जाते. गाभाऱ्यामध्ये ही देवी महिषासुराचे मर्दन करीत आहे. काळ्या पाषाणात ही मूर्ती कोरलली आहे. हातामध्ये त्रिशूल जो महिषासुराच्या मानेवर ठेवला आहे. दुसऱ्या हातात तलवार, तिसऱ्या हातात शंख व चौथ्या हातात ढाल गळ्यात कवड्याच्या माळा अशी सुंदर आकर्षक मनमोहक मूर्ती आहे. मंदिराची रचना आकर्षक असून मूर्तीची स्थापना करून सुमारे १३० वर्षांचा काळ लोटला आहे. १९८९ मध्ये या देवीचा शताब्दी महोत्सव झाला.

देवी भगवती मंदिराच्या आवारातील मंदिरे देवी अनभवनी, देवीपावणाई, देवी भावय, देव गांगो, देव नवनाथ, देव गायगरब, देव ब्राह्मण, देव बेळेपान, देव गिरावळ, देवी बायची आदी देवस्थळे आहेत. मंदिराच्या मागील बाजूस देव महापुरुषाचे ठिकाण आहे. देवी भगवती मंदिरात नवरात्रोत्सव, दसरोत्सव, त्रिपुरारी पौर्णिमा, शिमगोत्सव, गणेशोत्सव, देवदीपावली आदी उत्सव साजरे केले जातात. तर तीन वर्षांनी देवीची तरंगासह गावात डाळपस्वारी होते, तसेच गावातील कारिवणेवाडी येथील श्री. पाडावे यांच्या घरी देवी भगवती ‘माहेरवाशिनी’ म्हणून दर तीन वर्षांनी जाण्याची प्रथा आहे.

सुमारे तीनशे वर्षांपूर्वी मुणगे गाव हेळबादेवी कातवड या गावच्या पूर्वेला वसला होता. श्री देवी बायची ही सर्वांची ग्रामदेवता असावी असे काही जुन्या लोकांचे मत आहे. लोकांनी श्री देवी बायचीचे स्थान श्री देवी भगवतीला दिले आणि परिस्थितीप्रमाणे गावच्या पुष्कळशा भागाला मध्यवर्ती ठिकाण झाल्याने व सर्वांच्या श्रद्धेने श्री देवी भगवती सर्वांची ग्रामदेवता झाली. ही स्थिती साधारणपणे १६०० ते १७०० च्या नंतर कोल्हापूरच्या छत्रपतींच्या अमलाखाली हा भाग येऊन त्याकाळी खर्चासाठी म्हणून सुरुवातीला ५१ रुपये मिळत. एका सनदेने ही रक्कम श्री देवीला मिळाली व काही शेतजमिनी देवस्थानला मिळाल्या. त्या आजही देवस्थानच्या नावाने चालत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com