शिरोड्याची श्री देवी माऊली

अनिल निखार्गे
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

जागर नवरात्रोत्सवाचा...

नारळ पोफळीची गर्द वनराई, पांढराशुभ्र समुद्रकिनारा अशा निसर्गसंपन्न स्थळी वसलेले शिरोडा हे टुमदार गाव. ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा असलेले हे गाव जितके देखणे तितके वैशिष्ट्यपूर्ण आहे. चारशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेले गावचे दैवत श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान प्रसिद्ध आहे. या मंदिरात वर्षाचे ३६५ दिवस भजन केले जाते, हे येथील वैशिष्ट्य. 

नारळ पोफळीची गर्द वनराई, पांढराशुभ्र समुद्रकिनारा अशा निसर्गसंपन्न स्थळी वसलेले शिरोडा हे टुमदार गाव. ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा असलेले हे गाव जितके देखणे तितके वैशिष्ट्यपूर्ण आहे. चारशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेले गावचे दैवत श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान प्रसिद्ध आहे. या मंदिरात वर्षाचे ३६५ दिवस भजन केले जाते, हे येथील वैशिष्ट्य. 

शिरोड्याचे पूर्वीचे नाव शिरवडे. शिरवडे गावात श्री देवी जोगेश्‍वरीचे (Jogeshwari) मंदिर पहिले. त्यानंतर देव गावदे कुलस्वामी (Kulaswami) देवी माऊलीचे मंदिर स्थापन केल्याची माहिती जाणकारांकडून मिळाली. शतापीठ सभामंडप, मध्यभाग, गाभारा अशी रचना असलेले हे प्रशस्त मंदिर आहे. गाभाऱ्यात देवी माऊलीची सुंदर अशी पाषाणी मूर्ती असून, इतर देवदेवतांच्याही पाषाणी मूर्ती आहेत. डाव्या बाजूला देव महादेवाची पिंडी असून, देवस्थानाचे परब (धाकटे), गावडे, परब (थोरले), हादकी, नाबर हे विश्‍वस्त आहेत.

देवी माऊली पंचायतन देवस्थानच्या अधिपत्याखाली देवी माऊली व त्या मंदिरातील देवदेवता, देव महादेव, देव पूरस्पाद, देवी जोगेश्‍वरी, देव नितकारी, देव जागनाथ, देव गिरोबा, देव निरकांद, देव घाडवस, देव दांडेकर (महादेव) आदी देवस्थाने येतात. मंदिरात वर्षाकाठी अनेकविध उत्सव-सण होतात. नवरात्रोत्सव त्यापैकीच एक.
श्रावणातील अखंड हरिनाम सप्ताह, नवरात्रोत्सव आणि वार्षिक जत्रोत्सव हा मोठा उत्सव होय.

देवीला नऊवारी साडी, केळी ठेवणे, खणा-नारळाने ओटी भरली जाते. देवी मंदिराच्या उजव्या बाजूला जांभ्या दगडाचे बांधकाम असलेला दीपस्तंभ आहे. हे बांधकाम वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना मानता येईल. १९३० मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या आदेशानुसार शिरवडे गावी जो ऐतिहासिक मीठ सत्याग्रह झाला होता, त्यातील सत्याग्रहींची राहण्याची व्यवस्था या मंदिराच्या धर्मशाळेत केली गेली होती. सत्याग्रहींना आश्रय देण्यात आला.

इंग्रजांविरोधात सहकार्य केले त्याबद्दल देवस्थानच्या तत्कालीन विश्‍वस्तांविरोधात इंग्रज सरकारने खटले भरले. एवढेच काय तर तुरुंगवासाची शिक्षाही ठोठावली होती. सत्याग्रहाचे नेतृत्व करणारे (कै.) मामासाहेब देवगिरीकर यांनी या देवस्थानाबद्दल गौरवोद्‌गार काढले होते. गेली बरीच वर्षे या मंदिरात नवरात्रोत्सव साजरा केला जातो आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sindhudurg news shirodyache shree Devi Mauli