असनियेची श्री देवी माऊली

भूषण आरोसकर
Friday, 29 September 2017

जागर नवरात्रोत्सवाचा....

भक्तांच्या नवसाला पावणारी व हाकेला धावणारी अशी भाविकांमध्ये श्रद्धा असलेली असनिये येथील ग्रामदैवत श्री देवी माऊली जगप्रसिद्ध आहे. असनिये गावात शिमगोत्सवानिमित्त मोठा उत्सव होत असतो. दशक्रोशीसह या उत्सवाला श्री देवी माऊलीचे तसेच वाघदेवाचे दर्शन घ्यायला मोठ्या संख्येने गर्दी होते. वर्षातून येणारा शिमगोत्सव इथला प्रमुख सण समजला जातो

भक्तांच्या नवसाला पावणारी व हाकेला धावणारी अशी भाविकांमध्ये श्रद्धा असलेली असनिये येथील ग्रामदैवत श्री देवी माऊली जगप्रसिद्ध आहे. असनिये गावात शिमगोत्सवानिमित्त मोठा उत्सव होत असतो. दशक्रोशीसह या उत्सवाला श्री देवी माऊलीचे तसेच वाघदेवाचे दर्शन घ्यायला मोठ्या संख्येने गर्दी होते. वर्षातून येणारा शिमगोत्सव इथला प्रमुख सण समजला जातो. या वेळी या देवताचे दर्शन करण्यासाठी मुंबई, गोवा, कर्नाटकातूनही मोठ्या संख्येने मंडळी येतात.

शिमगोत्सवासोबतच असनियेच्या या पवित्र मंगल भक्तीमय श्रद्धास्थानावर महत्वाचे सण, उत्सवही होतात.  याच घटस्थापनेच्या दिवशी श्री देवी माऊलीकडे भक्तमंडळी दर्शनासाठी गर्दी करतात. दसऱ्यालाही या ठिकाणी आवर्जुन उपस्थिती दर्शवितात. शिवाय रहाटीचे कार्यक्रमही होतो. संस्कृती जपणारे गाव अशी ओळख असलेल्या असनियेच्या शिमगोत्सवाची हजारो भाविकांच्या उपस्थितीत सांगता होते. वर्षभर गावात असलेली दारूबंदी या उत्सवात आजच्या शिमगोत्सवाच्या सांगतेवेळी काही तासांसाठी उठते. या वेळी काढलेले रोंबाट लक्षवेधी ठरते.

वर्षभर विविध इतर छोटे मोठे धार्मिक कार्यक्रम सुरूच असल्याने येथील वातावरण भक्तिमय असतो. श्री देवी माऊलीकडे कौल घेणे, प्रसाद घेणे या माध्यमातून आपल्या मनातील साकडे भाविक देवीकडे मांडण्यासाठी येतात. यावेळी देवी त्यांना उचित मार्गदर्शन करते. कौल प्रसादासाठीही येथे गर्दी दिसून येते.

भक्तांच्या हाकेला धावणारी श्री देवी माऊली अशी ख्याती असल्यामुळे गावातील स्थानिक ग्रामस्थासमवेत, बाहेर परदेशात वास्तव्यास असणारा देवीचा भक्त गावात आल्यावर देवीचे दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. श्री देवीच्या कृपेनेही गावकरी मंडळीत एकोपा तसेच पांरपारिक उत्सवही मोठ्या श्रद्धेने जपले जात आहेत. यात सगळ्यामध्ये वर्षातून एकदा होणाऱ्या नऊ दिवसांच्या शिमगोत्सवाचे महत्त्वाचे स्थान आहे. 

माहेरवाशिणीचा देव अशी ओळख असलेल्या वाघदेवाच्या दर्शनासाठीही गर्दी होते. ओटी भरण्यासाठीही गर्दी केली होते. असनियेच्या शिमगोत्सवाचे इकाच्या वाटीतील वर्षातून एकदाच मिळणारे तीर्थ हे एक वैशिष्ट्य. गावचा मानकरी भगव्या वेशात या दुर्धर आजार दूर करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या वाटीतील तीर्थ देतो. या वेळी या तीर्थासाठी तसेच शिमगोत्सवासाठी जिल्ह्यासह मुंबई, पुणे, गोवा, कर्नाटकातील भाविकांचीही गर्दी होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sindhudurg news Shree Devi Mauli Asaniye