विद्यार्थीच नाहीत तर मग शाळेत येण्याची सक्ती का ?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

शासनाने ऑनलाइनचा पर्याय समोर ठेवला आहे. बहुसंख्य शिक्षक हे घरातूनच ऑनलाइन अध्यापन करत आहेत

रत्नागिरी : शाळेत येण्याबाबत कोणत्याही सूचना नसताना जिल्ह्यातील बहुसंख्य माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक १०० टक्के शिक्षकांना शाळेत बोलावून घेतात. याबाबत शिक्षकांना अशी सक्ती करू नये, अशी मागणी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांच्याकडे केली.

हेही वाचा - विकेल ते पिकेल साठी झाली कोकणातील या पाच जिल्ह्यांची निवड

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने शाळा कधी सुरू होतील, याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. असे असले तरी शासनाने ऑनलाइनचा पर्याय समोर ठेवला आहे. बहुसंख्य शिक्षक हे घरातूनच ऑनलाइन अध्यापन करत आहेत. संबंधित शिक्षकांना त्यांचे वेळापत्रक विषय वाटप करण्यात येते. संबंधित विद्यार्थ्यांचे ग्रुप केले आहेत. तसेच ऑनलाइन पद्धतीने अध्यापन करून पेपरही सोडवण्यासाठी देत आहेत. एकीकडे अशा पद्धतीने घरातून ऑनलाइन अध्यापन सुरू असताना जिल्ह्यातील बहुसंख्य शाळेत १०० टक्के शिक्षकांना उपस्थित राहण्याचा आग्रह केला जात आहे. 

हेही वाचा - रेंज नाही, इंटरनेट नाही, अभ्यास कसा करु ? अडीच हजार विद्यार्थ्यांना पडलाय हा प्रश्न 

वास्तविक शिक्षकांचे शाळेत कोणतेही काम नसताना शाळांमध्ये येण्याचे बंधनकारक करण्यात येत आहे. शासनाच्या आदेशानुसार शिक्षकांना शाळेत आवश्‍यकतेनुसार व एकावेळी सर्वांना न बोलावता टप्प्याटप्प्याने बोलावणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर फक्त ५० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत बोलावण्यात यावे, असे स्पष्ट आदेश आहेत. या आदेशाला जिल्ह्यात बहुसंख्य शाळांनी केराची टोपली दाखवली आहे. याबाबत रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने शिक्षण विभागाकडे निवेदन दिले आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 100 percent presenti is not compulsory for school level teachers the statement giving to education officer in ratnagiri