चिपळूणात कोरोनाग्रस्तांचा एक हजाराचा टप्पा पार ; या वयोगटातील व्यक्तींचा अधिक समावेश

मुझफ्फर खान
Monday, 24 August 2020

जुने आजार आणि कोरोनाचे उशिरा निदान यामुळे चिपळूणात कोरोनाग्रस्त रूग्ण दगावत आहेत

चिपळूण : चिपळूणात कोरोनाग्रस्तांनी एक हजाराचा टप्पा गाठला. जुने आजार आणि कोरोनाचे उशिरा निदान यामुळे चिपळूणात कोरोनाग्रस्त रूग्ण दगावत आहेत. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास तत्काळ उपचार घेतल्यास मृत्युदर कमी करता येईल. अशी माहिती कामथे उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सानप यांनी ‘सकाळ’ला दिली. रोजगार  किंवा व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणार्‍या 31 ते 40 वयोगटातील व्यक्ती करोनाच्या विळख्यात सापडल्या आहेत. 

हेही वाचा - ग्रामस्थांनी त्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र...

चिपळूणात एकूण 1 हजार 6 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. यातील 300 रूग्ण उपचार घेत आहेत. तर 676 रूग्ण उपचार घेवून घरी परतले आहेत. 30 जणांचा मृत्यु झाला आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 67.20 टक्के असले तरी कोरोनाच्या विळख्यात सापडणार्‍यांमध्ये 31 ते 40 वर्षे वयोगटातील बाधितांची संख्या अधिक आहे. 51 ते 60 वयोगटातील बाधितांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाग्रस्तांच्या मृत्यु दरात रत्नागिरीनंतर चिपळूण तालुक्याचा क्रमांक लागत आहे. 

नुकतेच अलोरेतील 30 वर्षीय कोरोनाग्रस्त तरूणाचे निधन झाले. यामुळे चाळीशीच्या आतील कोरोनाग्रस्तांचा मृत्यु होत आहे. या पार्श्‍वभूमीवर कामथे उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सानप यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, ज्यांना बीपी, शुगर तसेच अन्य रोग आहेत. अशा रूग्णांची प्रतिकार शक्ती कमी असते. ते कोरोनाचे बळी ठरत आहेत.

सर्दी, खोकले, ताप आला तर लोक अंगावर काढत आहेत. मला काही होत नाही अशी समज करून घरच्या घरी घरगुती औषधे घेवून बरे होण्याचा प्रयत्न करतात. त्यातूनही जे बरे होत नाही ते नंतर खासगी किंवा सरकारी रूग्णालयात उपचार घेतात. सुरवातीचा कोरोनाची लक्षणे कमी असताना उपचार घेतले तर आम्ही आठ ते दहा दिवसात रूग्णांना बरे करून घरी पाठवले आहेत. शेवटच्या स्टेजला जे रूग्णालयात दाखल होतात त्यांना वाचवताना मोठी कसरत करावी लागते.

हेही वाचा -  सिंधुदुर्ग अमली पदार्थ साठ्याचा सेफ झोन ?

"आम्ही मृत्यु दर कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. कोरोनाची प्राथमीक लक्षणे दिसल्यानंतर नागरिकांनी तत्काळ तपासणी करून घेणे गरजेचे आहे. लोकांचा आणि शेजार्‍यांचा विचार न करता स्वतःच्या जीवाचा विचार केला पाहिजे. तेव्हाज आपण कोरोनावर मात करू शकतो."

- डॉ. अजय सानप, वैद्यकीय अधिकारी कामथे उपजिल्हा रूग्णालय

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1000 and above corona patients found chiplun in ratnagiri