आई गेल्याचे दु:ख पेलत तिने सावरले कुटुंब अन् दहावीच्या परीक्षेत घेतली भरारी..

राजेंद्र बाईत
Tuesday, 4 August 2020

ना खाजगी क्लासेस ना शैक्षणिक सुविधा. तरीही केवळ शाळेतील शिकवणीला जिद्द, नियोजनबद्ध प्रयत्न आणि मेहनतीची जोड देत...

राजापूर (रत्नागिरी)  : आईचे दोन वर्षापूर्वी अचानक झालेले निधन. त्यामुळे कुटुंबातील मोठी मुलगी म्हणून घर सांभाळण्याची सर्वस्वी जबाबदारी तिची. त्यातून घरातील वयोवृद्ध आजी आणि अन् लहान भावाची आधारवडही तिच. अशा स्थितीतही न डगमगता रिक्षा व्यवसायिक असलेल्या वडीलांच्या जोडीने लहान वयातच घराचा सर्वस्वी डोलारा सांभाळत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तालुक्यातील अणसुरे येथील स्नेहल नितीन कणेरी दहावीच्या परिक्षेमध्ये तब्बल 96 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली.

ना खाजगी क्लासेस ना शैक्षणिक सुविधा. तरीही केवळ शाळेतील शिकवणीला जिद्द, नियोजनबद्ध प्रयत्न आणि मेहनतीची जोड देत ग्रामीण भागातील स्नेहलने प्रतिकूल परिस्थितीमध्ये मिळविलेले धवल यश निश्‍चितच इतरांसमोर आदर्शवत म्हणावे लागेल.  
गावातील जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षणानंतर श्री सिद्धिविनायक विद्यामंदीर, अणसुरेमध्ये माध्यमिक शिक्षणाचे धडे गिरवणार्‍या स्नेहलच्या आईचे दोन वर्षापूर्वी आकस्मिक निधन झाले.

हेही वाचा- एकिकडे रक्षाबंधनाचा उत्सव अन् दुसरीकडे चिमुकल्या भाऊ-बहिणीचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह... -

आईच्या निधनाने स्नेहलच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. वडीलही आतून काहीसे खचले होते. त्याच्यातून स्वतःला सावरत, कणखर होत वडीलांची कुटुंबाला सावरण्याची धडपड सुरू होती. ती पाहून छोट्या स्नेहलने बालवयात आपली जबाबदारी ओळखून वडीलांना यशस्वीपणे साथ दिली. वयोवृद्ध आजीसह छोट्या भावाची कर्त्या प्रौढ व्यक्तीसारखी सांभाळ करीत ती स्वतःच्या शिक्षणाकडेही तितकीच लक्ष देत होती. स्वयंपाकासह अन्य घरातील छोटी-मोठी कामे करताना शाळेच्या सकाळच्या जादा क्लासला ती वेळतच हजर राहत असे. सायंकाळी घरी परतल्यानंतरही घरातील दैनंदीन कामे उरकल्यानंतर रात्री उशीरा नव्या जोमाने नियोजनबद्धरीत्या अभ्यास करीत होती.

हेही वाचा- राजापूरमध्ये अर्जुना कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली ;  व्यापार्‍यांची उडाली तारांबळ... -

शाळेमध्ये प्रशाळेचे मुख्याध्यापक संजय मांडवकर, शिक्षक हरिश्‍चंद्र शिवगण, विलास जाधव, एन.एच.कांबळे यांचे तर, घरामध्ये दहावी शिकलेले वडील नितीन यांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर कोणतेही खाजगी क्लासेस न लावता ग्रामीण भागातील स्नेहलने दहावीमध्ये तब्बल 96 टक्के गुण मिळवित प्रशाळेमध्ये पहिला क्रमांक पटकाविला. एवढेच नव्हे तर, प्रशाळेच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होणारी पहिली विद्यार्थीनीही म्हणूनही तिने मान पटकाविला. या यशाबद्दल स्नेहलचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.          

हेही वाचा- चिपळूणमध्ये हे शेतकरी पीकविमा योजनेपासून वंचितच; ग्रामीण भागात या सुविधेचा अभाव.. -

“ प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्नेहलने मिळविलेले यश निश्‍चितच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. जागरूक पालकांमुळे मुले कसे धवल यश मिळवू शकतात याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे स्नेहल आहे. जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीवर मात केलेल्या स्नेहलचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे. तिच्या या स्वप्नाला आकार देण्यासाठी सढळ हस्ते मदत करणार्‍या समाजातील दात्यांच्या सहकार्याची गरज आहे. ”

संजय मांडवकर, मुख्याध्यापक, श्री सिद्धीविनायक विद्यामंदीर अणसुरे

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10th exam pass successfully story in rajapur Snehal Nitin Kaneri passed 96 percent marks