रत्नागिरीत ११ जनावरांना लॅम्पी स्कीन डिसीज ; ४६८ पशुधनांचे लसीकरण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

हातखंबा येथे लागण झालेल्या पशुधनामध्ये जनावरांना ताप येणे, चारा खाणे, पाणी पिणे याचे प्रमाण कमी होणे आदी लक्षणे दिसून आली होती.

रत्नागिरी : तालुक्‍यातील हातखंबा कार्यक्षेत्रात पशुधनातील लॅम्पी स्कीन डिसीज झालेली अकरा जनावरे आढळून आली आहेत. या परिसरातील ४६८ पशुधनांवर पुशवैद्यकीय विभागाने लसीकरण केले. तसेच घरनिहाय पशुधनाची नोंदणी व पाठपुरावा करण्याचे काम सुरू केले.

हेही वाचा - कोकण मार्गावर शुक्रवारपासून धावणार फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाड्या -

हातखंबा येथे लागण झालेल्या पशुधनामध्ये जनावरांना ताप येणे, चारा खाणे, पाणी पिणे याचे प्रमाण कमी होणे आदी लक्षणे दिसून आली होती. ही बाब शेतकऱ्यांनी तत्काळ रत्नागिरी तालुका पशुसंवर्धन विभागाकडे कळवली. वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित कसालकर यांनी तातडीने हातखंबा येथे भेट देऊन योग्य ती उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याकरिता डॉ. यतिन पुजारी, डॉ. जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कसालकर यांनी औषधोपचार करून लागण होण्याच्या प्रमाणावर वेळीच आळा घालण्यासाठी पावले उचलली आहेत.

येथील पशुधनावर लसीकरण केले असून घरनिहाय पशुधनाची नोंदणी व पाठपुरावा करण्याचे काम सुरू आहे. औषधोपचार केलेल्या जनावरांमध्ये पशुपालकांमधील भीतीचे वातावरण दूर झाले आहे. शनिवारी राबवलेल्या लसीकरण मोहिमेत एकूण २८८ गुरांना डोस देण्यात आला. त्यानंतर सोमवारी १८० गुरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. या आजाराबाबत हातखंबाव्यतिरिक्त आजूबाजूच्या परिसरातही पशुपालकांकडून माहिती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

लसीकरण करताना जिल्हा उपायुक्त डॉ. सुभाष म्हस्के यांनी विशेष मार्गदर्शन केले. या रोगाबाबत जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती बाबू म्हाप, जिल्हा परिषद सदस्य कदम, पंचायत समिती सदस्या साक्षी रावणंग आदींनी विशेष लक्ष घालून पशुपालकांशी चर्चा करून रोगाबाबत माहिती करून 
घेतली आहे.

हेही वाचा -  निसर्गाच्या कोपाने बळीराजा सैरभैर -

"सध्याच्या परिस्थितीत पुरेशी लसमात्रा उपलब्ध असल्याने सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनास लसीकरण करून घ्यावे."

- साक्षी रावणंग, सदस्य, पंचायत समिती

ही आहेत लक्षणे

- जनावरांना ताप, नाकातोंडावर व्रण. 
- त्वचेवर, मान, डोके, कान इत्यादी ठिकाणी गाठी. 
- चारा खाणे, पाणी पिणे याचे प्रमाण कमी.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 animal lumpy skin disease in ratnagiri 468 animal have vaccine on this disease in ratnagiri