
दापोलीतील निवृत्तीला आलेला शासकीय कर्मचारी जाळ्यात
दाभोळ (रत्नागिरी) : दापोली तालुक्यातील निवृत्तीला आलेल्या एका शासकीय कर्मचाऱ्याला जेसिका नेन्सी या अमेरिकन मुलीने प्रेमाचे आमिष दाखवून त्याची ११ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
दापोली शहरालगतच्या गावात राहणाऱ्या व निवृत्तीला काही महिने बाकी असलेल्या एका शासकीय कर्मचाऱ्याला जेसिका नेन्सी या मुलीने फेसबुकवर फ्रेंड रीक्वेस्ट पाठविली होती. त्याने ती मान्य केली. त्यानंतर जेसिकाने या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मी अमेरिकन सैन्यात नोकरी करत असून सध्या अफगाणिस्तान देशात माझी नियुक्ती झाली असून मला एक मुलगीही असून मला माझे पुढील आयुष्य तुमच्याबरोबर व्यतीत करायचे आहे. त्यासाठी मी तुम्हाला ७ लाख ५० हजार डॉलर पार्सलने पाठविणार असल्याचे तिने सांगितले.
हेही वाचा- Inspiring: रसायनशास्त्रातील प्रयोगांची प्रक्रिया सुलभ; प्लॅटिनमला दिला पर्याय -
डॉलर असलेले हे पार्सलचे कस्टम क्लीअरन्स करण्यासाठी १६ नोव्हेंबर रोजी फोन पे द्वारे ७५ हजार रुपये या व्यक्तीकडून उकळले. त्यानंतर युको बॅंकेतील एका खात्यात २ लाख २५ हजार रुपये भरण्यासाठी सांगितल्यावर याने तेही पैसे भरले. त्यानंतर स्टेट बॅंकेतील एका खात्यात ९५ हजार रुपये भरले असे वेळोवेळी एकूण ११ लाख ६० हजार रुपये या कर्मचाऱ्याने जेसिकाला दिले. त्यानंतर आपण फसले गेलो, हे समजल्यावर या कर्मचाऱ्याने दापोली पोलीस ठाण्यात आज फसवणुकीची तक्रार दाखल केली. दापोली पोलिसात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास निरीक्षक राजेंद्र पाटील करत आहेत.
संपादन- अर्चना बनगे