esakal | निसर्ग चक्रीवादळामध्ये साडेबारा लाखांची हानी 
sakal

बोलून बातमी शोधा

12 Lakhs Damage In Nisarg Cyclone Ratnagiri Marathi News

जिल्ह्यात दोन आणि तीन जूनला निसर्ग चक्रीवादळ झाले होते. यावेळी रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्यात नुकसान कमी झाले असले तरी अनेक भागांत वित्तहानी झाली होती. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 25 कोटींची आर्थिक मदत जाहीर केली होती.

निसर्ग चक्रीवादळामध्ये साडेबारा लाखांची हानी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - जिल्ह्यात दोन व तीन जूनला झालेल्या निसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यातील 24 हेक्‍टर 77 एकर क्षेत्रावरील फळ पीक व बागायती पिकाचे नुकसान झाले आहे. यामुळे 299 शेतकरी बाधित झाले असून एकूण 12 लाख 41 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. 

जिल्ह्यात दोन आणि तीन जूनला निसर्ग चक्रीवादळ झाले होते. यावेळी रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्यात नुकसान कमी झाले असले तरी अनेक भागांत वित्तहानी झाली होती. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 25 कोटींची आर्थिक मदत जाहीर केली होती.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी या निसर्ग वादळात बाधित झालेल्या शेती व बागायती क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिले होते. तलाठी, ग्रामसेवक व कृषी अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून पंचनामे करावे, असे हे आदेश होते. हे संयुक्त पंचनामे पूर्ण झाले असून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांना सादर केला आहे. 

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 33 टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळपिके व बागायती यांचे पंचनामे केले आहेत. यात आंबा पिकाचे 4 हेक्‍टर 22 एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. काजू क्षेत्राचे 13 हेक्‍टर 23 एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे तर इतर पिकांचे मिळून 2 हेक्‍टर 25 एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारे एकूण 19 हेक्‍टर 70 एकर क्षेत्राचे नुकसान झाले असून यामुळे 185 शेतकरी बाधित झाले आहेत. याची भरपाई रक्कम 9 लाख 87 हजार रुपये एवढी आहे. 

या निसर्ग चक्रीवादळात बागायती पिकाखाली असलेल्या 5 हेक्‍टर 7 एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यात भाजीपाला नुकसानी नसून नारळ पिकाखालील 2 हेक्‍टर 19 एकर क्षेत्र बाधित झाले आहे. केळीचे 1 हेक्‍टर 60 एकर क्षेत्र बाधित झाले आहे. सुपारीचे 1 हेक्‍टर 26 एकर क्षेत्र बाधित झाले आहे. इतर पिके 2 एकर क्षेत्रावरील बाधित झाली आहेत. यामुळे 114 शेतकरी बाधित झाले असून यासाठी 2 लाख 54 हजार एवढा निधी अपेक्षित आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस 

संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश देऊन अनेक दिवसांचा कालावधी उलटला असल्याने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 
 

 
 

loading image