अबब.. ! दिवेआगार समुद्रकिनाऱ्यावर सापडला तब्बल 13 फूट लांबीचा देवमासा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

साधारणता 13 फूट लांब आणि 4 फूट जाडीचा हा देवमासा असून त्याच वजन 1 टनाहून अधिक असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.​

रायगड : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर बीचवर महाकाय देवमासा सापडला असून हा देवमासा पाहण्यासाठी आसपासच्या लोकांसह पर्यटकांनी बीचवर मोठी गर्दी केली होती. खोल समुद्रात एखाद्या बोटीच्या पंख्याला धडकून जखमी झाल्याने हा देवमासा समुद्र किनाऱ्यावर आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दिवेआगर बीचवर सोमवारी (ता.8) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास समुद्राच्या लाटांसह हा देवमासा समुद्र किनाऱ्यावर आला. समुद्र किनारी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी या महाकाय माशाला बीचवर तडफताना पाहिले. मात्र, त्याचा आकार पाहून कुणीही या माशाच्या जवळ गेले नाही. काही वेळाने किनाऱ्यावरच या माशाने प्राण सोडले.

साधारणता 13 फूट लांब आणि 4 फूट जाडीचा हा देवमासा असून त्याच वजन 1 टनाहून अधिक असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सदर घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली असून उद्या वन खाते, मत्स्य विभाग आणि तटरक्षक दलाच्या मदतीने या माशाची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 13 feet long Devmasa found on the Diveagar beach