उद्‌ध्वस्त बागायतीत पिकवला भाजी मळा ; तेरा मित्रांची जिद्द

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 November 2020

निसर्गमध्ये उद्‌ध्वस्त झालेल्या अन्य बागायतदारांसाठी हा आदर्श ठरला आहे.

दाभोळ (रत्नागिरी) : दापोली तालुक्‍यातील आंजर्ले येथील अनेक बागांचे निसर्गवादळाच्या तडाख्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामधून सावरण्यासाठी बराच काळ लागणार आहे; मात्र खचून न जाता आंजर्ले गावातील तेरा मित्र एकवटले आणि सामूहिक भाजी लागवडीतून उत्पन्नाचे साधन उभारले. निसर्गमध्ये उद्‌ध्वस्त झालेल्या अन्य बागायतदारांसाठी हा आदर्श ठरला आहे.

हेही वाचा - बिबट्याचे हल्ल्यात वासर ठार ; ग्रामस्थांत भीती -

चक्रीवादळामुळे आंबा, नारळ व सुपारीच्या बागाही उद्‌ध्वस्त झाल्यामुळे अनेकांच्या रोजगारावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. यातून आंजर्लेतील १३ युवकांनी एकत्र येऊन राजेश जैन यांच्या सुकोंडी येथील ८ एकर जागेपैकी ४ एकर जागेत सामूहिक भाजी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला. आंजर्लेतील व्यापारी व पर्यटन व्यावसायिक राजेश जैन यांची ८ एकर जमीन आहे. तिथे त्यांनी फळझाडे लावली होती; मात्र निसर्ग वादळात फळबाग उद्‌ध्वस्त झाली.

जैन यांनी लवकर येणारे व नगदी पीक म्हणून आपल्या ४ हेक्‍टरात मित्रांच्या मदतीने भाजीपाला लागवड केली. संदेश देवकर, संतोष तवसाळकर, प्रशांत भाटकर, अभिजित खेडेकर, प्रभाकर सांबरे, शरद सांबरे, प्रदीप सांबरे, कैलास भांबिड, रूपेश नटे, तेजस पेठकर यांनी साथ दिली. ज्यांना शक्‍य होते, त्यांनी आर्थिक साहाय्य केले. काहींनी अंगमेहनत केली. या प्रयत्नातून चार एकरात टोमॅटो, मिरची, कलिंगड, काकडी, वांगी, कडवा, पावटा, चवळी, भुईमूग, कोबी, हळद, पपई, शेवगा, केळी, कोथिंबीर, मुळा, माठ यांचे बियाणे लावण्यात आले.

हेही वाचा -  दर्शनासाठी भक्तांची गणपतीपुळ्यात मांदियाळी -

हे सर्वजण दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत बागेत आवडीने काम करतात. वन्य श्वापदांपासून बागेचे रक्षण करण्यासाठी बागेतच मुक्काम करतात. त्यांना सिजेंन्टा या बियाणे कंपनीने मार्गदर्शन केले . कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत किंवा फवारणी केलेली नाही. नैसर्गिक खतांच्या मात्रा दिल्या आहेत. 

"चार एकरात केलेली ही शेती गावकऱ्यांचा व पंचक्रोशीत कौतुकाचा विषय झाली आहे. अनेकजण ही एकत्रित केलेली भाजीपाला लागवड पाहण्यासाठी येतात. या पिकाची काढणी झाल्यानंतरही याच जागी पुढील प्रयोग करण्याचा मानस आहे."

- राजेश जैन, आंजर्ले

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 13 friends are come together and vegetables cultivation in four cars in ratnagiri