रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी 'ही' आहे मॅजिक फिगर

राजेश शेळके
Monday, 16 December 2019

तिन्ही उमेदवारांकडे नऊ ते बारा हजारांदरम्यान हक्काचे मतदान आहेत. गेल्या काही निवडणुकांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते. पालिकेच्या पोटनिवडणुकीला राज्यातील राजकीय घडामोडींची मोठी किनार असल्याने सर्वच पक्षांनी आपली ताकद आजमावण्यासाठी स्वबळाचा नारा दिला आहे.

रत्नागिरी - नगराध्यक्ष पोटनिवडणुकीमध्ये काँटे की टक्कर होणार आहे. शिवसेनेचे प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी, भाजपचे ॲड. दीपक पटवर्धन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद कीर हे तिन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. जो उमेदवार बारा ते चौदा हजार मते घेणार तो निवडून येणार, अशी गणिते बांधली जात आहेत.

तिन्ही उमेदवारांकडे नऊ ते बारा हजारांदरम्यान हक्काचे मतदान आहेत. गेल्या काही निवडणुकांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते. पालिकेच्या पोटनिवडणुकीला राज्यातील राजकीय घडामोडींची मोठी किनार असल्याने सर्वच पक्षांनी आपली ताकद आजमावण्यासाठी स्वबळाचा नारा दिला आहे. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला शहरामध्ये चांगले मताधिक्‍य मिळाले. मात्र, तीन प्रभागांत शिवसेना पिछाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक स्वंतत्र मतदार आहे, तो प्रत्येक निवडणुकीत त्यांच्याबरोबर राहतो. त्यामध्ये मुस्लिम मतदारांचाही समावेश आहे. त्यामुळे आठ ते नऊ हजार मतदान आहे. भाजपचा ब्राह्मण समाजही शहरात मोठ्या संख्येने असल्याने संघावर विश्‍वास असलेल्या आणि ब्राह्मण उमेदवार असलेल्याला चांगले मतदान झाले आहे. राहुल पंडित हे त्याचे चांगले उदाहरण आहे. 

अशा आहेत उमेदवारांच्या जमेच्या बाजू

शिवसेनेचे बंड्या साळवी यांच्या धडाकेबाज निर्णय, कणखर आवाज, प्रशासनावर पकड, मजबूत संघटना जमेच्या बाजू आहेत. भाजपचे ॲड. दीपक पटवर्धन यांनी सहकार क्षेत्रामध्ये चांगले काम केले आहे. प्रशासन चालविण्याचा अनुभव आहे, स्वच्छ प्रतिमा आहे, उच्चशिक्षित अशा त्यांच्याही जमेच्या बाजू आहेत. पक्षांतर्गत वादावर कालच पडदा पडल्याने भाजपदेखील स्पर्धेमध्ये टिकून आहे. कीर यांनी सव्वा वर्ष नगराध्यक्षपद भूषवताना धडाकेबाज कामे केली. पालिकेला आर्थिक खाईतून सावरले, शहर विकास आराखडा तयार केला, विविध योजनांमधून निधी आणला. मनसेचे रुपेश सावंत सामाजिक कार्यात हिरिरीने सहभागी असतात. त्यामुळे नागरिकाच्या प्रश्‍नांची त्यांना जाण आहे. 

मॅजिक आकडा पार करण्यासाठी धडपड 

पोटनिवडणूक असल्याने ५८ हजार ७७० पैकी सुमारे ३० ते ३५ हजारांपर्यंत मतदान होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रमुख स्पर्धकांमध्ये १२ ते १४ हजारांचा मॅजिक आकडा पार करण्यासाठी धडपड सुरू आहे.

दृष्टिक्षेपात.. 

  •  शहरात ५८,७७० मतदार 
  •   २८,७४६ पुरुष मतदार
  •   ३०,०२३ महिला मतदार
  •   ४९ मतदान केंद्र

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14 Thousand Votes Magic Figure For Ratnagiri City President Election