ST Workers Strike : 15 कर्मचारी निलंबित तर 32 जणांवर कारवाईचा बडगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

कर्मचारी अजूनही स्थानकांवर येऊन आपला निषेध व्यक्त करीत आहेत.

ST Workers Strike : 15 कर्मचारी निलंबित तर 32 जणांवर कारवाईचा बडगा

कणकवली: राज्य शासनात एसटी महामंडळाच्या विलिनीकरणासाठी सुरू असलेल्या संपात आता प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. सिंधुदुर्ग विभागातील संपात सहभागी १५ कर्मचाऱ्यांवर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली. यात विभागीय कार्यशाळेतील आठ, सावंतवाडी आगारातील सहा आणि कुडाळ आगारातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या आधीही १७ जणांना निलंबित करण्यात आले.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे; मात्र आता संप फोडण्यासाठी राज्य शासन महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्नशील असून, कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा सेवेत रुजू होण्याचे आवाहन करण्यात आले; मात्र संपात सहभागी कर्मचारी अजूनही सेवेत रुजू होत नाहीत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक आगाराकडून उपस्थित कर्मचाऱ्यांची नोंदणी केली जात आहे. गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचा: गोपीचंद पडळकर,तानाजी पाटलांचा अर्ज फेटाळला ; आटपाडीत पोलिस तैनात

जिल्ह्यातील दोन हजार १४६ पैकी आतापर्यंत ३२ कामगारांवर कारवाई झाली. तरीही संपात एक हजार ९०० पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एसटी बससेवा अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. प्रवाशांनी खासगी गाड्यांमधूनच व्यवस्था केली आहे. त्यामुळे आता गावागावांत जाणाऱ्या एसटी बसला पर्यायी वाहनांची तयारी सुरू झाली आहे. पुढच्या काळात एसटी बससेवा सुरू झाली, तरी प्रवाशांकडून त्यांना कितपत प्रतिसाद मिळेल, हीसुद्धा एसटीच्या चिंतेची बाब आहे. विभागाला दोन कोटींपेक्षा अधिक तोटा सहन करावा लागत आहे. सर्व डेपोंमध्ये एसटी बस उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. कर्मचारी अजूनही स्थानकांवर येऊन आपला निषेध व्यक्त करीत आहेत. महामंडळ न्यायालयीन लढाईत व्यस्त आहे.

दृष्टिक्षेपात

* एकूण कर्मचारी ः २१४६

* संपात सहभागी ः १९०७

* १५० कंत्राटी चालक कम वाहकांना नोटिसा

* पहिल्या टप्प्यात १७ जणांचे निलंबन

* आतापर्यंत ३२ जण निलंबित

loading image
go to top