वीज वाहिन्या तुटल्याने पालीत 15 तास 'बत्ती गुल'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

रात्रभर सर्व कर्मचाऱ्यांसोबत बिघाड शोध सुरु होता. चार ठिकाणी वाहिन्या तुटल्या होत्या. त्यामुळे दुरुस्ती करण्यास वेळ गेला. अथक परिश्रमानंतर वीज पुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला.

- गोविंद बोईने, उपकार्यकारी अभियंता, वीज महावितरण, पाली

पाली (जिल्हा  रायगड) : उन्हाची काहिली वाढली आणि अशा गर्मीमध्ये वीज वाहिन्या तुटल्याने संपूर्ण पालीतील वीज पुरवठा शनिवारी (ता.6) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास खंडित झाला. रविवारी (ता.7) सकाळी साडेदहाच्या सुमारास तब्बल पंधरा तासांनी वीजपुरवठा पूर्वरत झाला. त्यामुळे ऐन गर्मीमध्ये नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

कानसई अती उच्चदाब उपकेंद्रातून पालीला विद्युत पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या चार ठिकाणी तुटल्यामुळे पालीतील वीज पंधरा तास गायब होती. वीज कर्मचारी रात्रभर दुरुस्तीचे काम करत होते. वीज नसल्याने पंखे, कुलर आणि आणि एसी ही उपकरणे काही कामाची राहिली नाहीत. अनेकांच्या इन्व्हर्टर मधील ऊर्जाही काही वेळाने संपली. परिणामी ऐन गर्मीमध्ये पालीकरांना याचा सामना करावा लागला. तसेच शनिवारी (ता. 6) गुढीपाडवा होता. संध्याकाळीच वीज पुरवठा खंडित झाल्याने उत्सव व शोभयात्रेसाठी निघालेल्या नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले.

सणासाठी पालीत आले होते. वीज पुरवठा खंडित झाल्याने छोट्या मुलांचे अधिक हाल झाले. रात्रभर गर्मीमुळे झोप दुरापास्त झाली. सामान्य नागरिकांना वीज का गेली व कधी येईल? हे माहीत नसल्याने हकनाक विजेची वाट पहावी लागली.

- नम्रता निरंजन सुर्वे, ग्रामस्थ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 Hours Electricity Problem in Pali Raigad