रत्नागिरी जिल्ह्यात तपासणीत आढळले 15 क्षयरुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जून 2019

एक नजर

  • क्षयरोग सर्वेक्षण मोहीमेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात केलेल्या तपासणीत 454 संशयित रुग्णांपैकी 15 जणांना क्षयाची लागण
  • मे महिन्यातील सर्वेक्षणात 1 लाख 56 हजार 561 जणांची तपासणी
  • राजापूर आणि मंडणगडमध्ये नाही एकही क्षयरोगाचा रुग्ण

रत्नागिरी - क्षयरोग सर्वेक्षण मोहीमेंतर्गत जिल्ह्यात केलेल्या तपासणीत 454 संशयित रुग्णांपैकी 15 जणांना क्षयाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर नियमित उपचार सुरु करण्यात आले आहेत. मे महिन्यातील सर्वेक्षणात 1 लाख 56 हजार 561 जणांची तपासणी करण्यात आली होती. राजापूर आणि मंडणगडमध्ये क्षयरोगाची लागण झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही. 

गेल्या सात वर्षात क्षयरोगाचा फैलाव वाढत आहे. खासगी रुग्णालयातून अनेक रुग्ण उपचार घेतात. परंतु, उपचारात सातत्य नसल्याने रोगाचा फलाव वाढतो. त्यानंतर त्याची लागण इतरांना होते. यासाठी केंद्र सरकारने खासगी डाक्‍टरर्सनाही क्षयरुग्णाची माहिती नजिकच्या सरकारी रुग्णालयाला देणे बंधनकारक केले आहे. तर रुग्णांना पाचशे रुपये आहार भत्ता देण्यात येणार असून, खासगी डॉक्‍टरला एक हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे.

क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य, केंद्र सरकारने प्रत्येक शासकीय रुग्णालयात स्वतंत्र केंद्राची उभारणी केली आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी जिल्हास्तरावरील रुग्णालयामधून क्षयरोगाची अत्यावश्‍यक औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहे.क्षयग्रस्तांच्या संख्येत घट व्हावी यासाठी जादा कर्मचारी वर्ग नियुक्‍त करून ग्रामीण भागातील क्षयग्रस्त रुग्णांपर्यंत औषध पोहोचविण्याचे काम केले जाते. 

तालुका क्षयरुग्ण 
* रत्नागिरी 3 
* कामथे 4 
* लांजा 3 
* कळंबणी 2 
* दापोली 1 
* चिखली 1 
* देवरूख 1 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 tuberculosis patient detected in Ratnagiri district