दिलासादायक ! रत्नागिरीतून एसटीच्या 1500 फेऱ्या 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

बसमधून प्रवास करताना प्रवाशांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बसेस निर्जंतुक करूनच मार्गस्थ केल्या जात आहेत. लांब व मध्यम लांब पल्ल्याच्या बसेससाठी एका आसनावर एक प्रवासी अशा तिरप्या पद्धतीने आरक्षण उपलब्ध करून दिले जात होते

रत्नागिरी - राज्य परिवहन महामंडळाच्या परिपत्रकानुसार आता रत्नागिरी एसटी विभागातून 100 टक्के प्रवासी क्षमतेने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. 320 गाड्या वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यातून एकूण 1500 फेऱ्या दिवसभरात सोडण्यात आल्या. पुरेशी काळजी घेऊन ही वाहतूक सुरू केली आहे. 

कोरोना, लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाची वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. मध्यंतरी स्थलांतरित मजुरांची वाहतूक एसटीने केली, तर 20 जूनपासून वाहतूक थोड्या प्रमाणात सुरू झाली. यामध्ये एका वेळी फक्त 22 प्रवाशांना प्रवास करता येत होता; पण आता अन्य काही राज्यांमध्ये 100 टक्के क्षमतेने वाहतूक सुरू झाल्याने शासनाच्या आदेशानुसार रा. प. महामंडळाने आजपासून वाहतूक सुरू करण्याचे निर्देश दिले. 

बसमधून प्रवास करताना प्रवाशांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बसेस निर्जंतुक करूनच मार्गस्थ केल्या जात आहेत. लांब व मध्यम लांब पल्ल्याच्या बसेससाठी एका आसनावर एक प्रवासी अशा तिरप्या पद्धतीने आरक्षण उपलब्ध करून दिले जात होते. तथापि आता सर्व आसने पूर्ववतप्रमाणे आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यानुसार रत्नागिरी एसटी विभागाने नियोजन केले असून भारमान पाहून व प्रवाशांच्या मागणीनुसार विविध ठिकाणी फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. 

63 कर्मचाऱ्यांना कोरोना 
रत्नागिरी एसटी विभागात आजपर्यंत 63 अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात आगारातील कर्मचाऱ्यांसह विभागीय प्रमुख अधिकारी, चालक, वाहक, विभागीय कार्यशाळेतील कारागीर, टीआरपी येथील कामगारांचा समावेश आहे. रत्नागिरी एसटी विभाग, रत्नागिरी आगारात सर्वाधिक रुग्ण आढळले. अन्य तालुक्‍यांमध्ये 2 ते 8 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने संबंधित विभागात काळजी घेतली जात आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1500 Rounds Of ST From Ratnagiri Marathi News