१६ हेक्‍टर क्षेत्रावर घेतले विक्रमी उत्पादन ; २०० किलो ते ३ टनांपर्यंत उत्पादनात वाढ

नरेश पांचाळ
Wednesday, 13 January 2021

३४० क्विंटल भात बियाण्याचे उत्पादन कृषी संशोधन केंद्राकडे जमा केले, अशी माहिती संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. भरत वाघमोडे यांनी दिली. 

रत्नागिरी : शासनाच्या बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत भात बियाण्यांची साखळी (सीड चेन) तयार करण्याच्या उद्देशाने कोकण कृषी विद्यापीठांतर्गत येथील शिरगाव कृषी संशोधन केद्रांतर्फे जिल्ह्यातील ५५ शेतकऱ्यांच्या शेतावर भातबियाणे घेण्यात आले. शेतकऱ्यांनी १६ हेक्‍टर क्षेत्रावर विक्रमी उत्पादन घेतले असून ३४० क्विंटल भात बियाण्याचे उत्पादन कृषी संशोधन केंद्राकडे जमा केले, अशी माहिती संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. भरत वाघमोडे यांनी दिली. 

शेतकऱ्यांनी शिरगाव कृषी संशोधन केंद्रातील पॉप्युलर भात जाती रत्नागिरी-८, रत्नागिरी-६, रत्नागिरी-१ यांचा उपयोग केला. जिल्ह्यातील गणेशगुळे, बसणी, कोतवडे, वेतोशी, मेर्वी, शिरगाव, नेवरे, रिळ, कासारवेली, पुर्णगड, गोळप, आसगे (ता. लांजा), कोळवण (जि. सिंधुदुर्ग) येथील शेतकरी सहभागी झाले. शेतावर हे बियाण्यांचे वाण घेताना संशोधन केंद्रातर्फे तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत होते.

हेही वाचा - संयुक्‍त महाराष्ट्रासाठी छातीवर झेलल्या गोळ्या -

डॉ. भरत वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या शेतकऱ्यांच्या शेतावर वाणीची निर्मिती केली होती, त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत होती तसेच कीड, रोग, खताची माहिती देण्यात येत होती. सीड चेन हा विद्यापीठाचा उद्देश सफल व्हावा, यासाठी सहभागी शेतकऱ्यांना भातशेतीविषयी संशोधन केंद्राकडून प्रशिक्षणही दिले होते तसेच मोफत बियाणे दिले होते. जास्त उत्पादन मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याला ठेवून उर्वरित भात कृषी संशोधन केंद्राला दिले.

‘सीड चेन’चा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

सीड चेनसाठी १० गुठ्यांत शेतकऱ्यांनी भात बियाणे तयार केले. उत्पादनवाढीसाठी संशोधन केंद्रातील बियाणे उपयुक्त आहे. शेतकऱ्यांनी मे महिन्यात शिरगाव कृषी संशोधन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. वाघमोडे यांनी केले.

बियाण्यावर प्रोसेसिंग सुरू

१६ हेक्‍टर शेतीमधील ३४० क्विंटल भात बियाणे कृषी संशोधन केंद्राकडे दिले. त्या बियाण्यावर प्रोसेसिंग सुरू असून मे महिन्यात शेतकऱ्यांच्या शेतीसाठी उपलब्ध करून देणार आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ‘नफा ना तोटा’ या तत्त्वावर विद्यापीठाने ठरवून दिलेला भातबियाण्याचा दर देण्यात आला. बारीक जातीच्या बियाण्याला प्रती किलो ३० रुपये, तर जाड दाण्यासाठी २८ रुपये भाव देण्यात आला.

हेही वाचा - सकाळी पहिला मृत कावळा आढळला अन् परिसरात एकच खळबळ

प्रगतशील शेतकरी 

तालुक्‍यातील प्रगतशील शेतकरी प्रकाश काशिनाथ शेट्ये-नेवरे यांनी रत्नागिरी-८ बारीक जातीच्या बियाण्याचे ६.६ टन प्रती हेक्‍टरवर उत्पादन घेतले तर रिळ येथील मिलिंद वैद्य यांनी ६.१ प्रती हेक्‍टर उत्पादन घेतले. सर्व शेतकऱ्यांचे २०० किलोपासून ३ टनांपर्यंत उत्पादन वाढले आहे.  

दृष्टिक्षेपात

 

  •  शिरगाव कृषी संशोधन केंद्राचा उपक्रम
  •  ठरवून दिलेला भातबियाण्याचा दर
  •  बारीक बियाण्याला प्रती किलो ३० रुपये
  •  जाड दाण्यासाठी प्रती किलो २८ रुपये

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: on 16 heater area crop of rice production in ratnagiri under the chain seed