खुषखबर ! कोकण रेल्वेच्या 162 गणेशोत्सव स्पेशल 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 August 2020

पहिली गाडी 15 ऑगस्टला सकाळी 4.30 वाजता चाकरमान्यांना घेऊन रत्नागिरी स्थानकात दाखल होईल. या चाकरमान्यांची कडक तपासणी करण्यासाठी महसूल, आरोग्य व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

रत्नागिरी - राज्य सरकारने कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव विशेष गाड्या चालविण्यास मध्य रेल्वेला परवानगी दिली आहे; मात्र प्रवास करणाऱ्यांची कडक तपासणी केली जाणार असून आजारी नसल्याचे हमीपत्र घेतले जाणार आहे. आरोग्य तपासणी आणि प्रवाशांच्या नोंदणीसाठी पथके नियुक्‍त केली आहेत. 15 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत 162 गाड्या धावणार आहेत. 

कोकण रेल्वे मार्गावर सोडलेल्या गाड्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनन्स ते रत्नागिरी गाडी 15 ते 22 ऑगस्ट आठ फेऱ्या आणि 16 ते 23 ऑगस्ट 8 फेऱ्या, मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी रोड प्रत्येकी 16 फेऱ्या, सीएसएमटी ते सावंतवाडी रोड सोळा फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनन्स ते कुडाळ 15 ते 23 ऑगस्ट 16 फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनन्स ते सावंतवाडी रोड 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 26 फेऱ्या, 
सीएसएमटी ते सावंतवाडी रोड 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 24 फेऱ्या, लोकमान्य टिळक ते रत्नागिरी 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत धावणार आहेत. 

पहिली गाडी 15 ऑगस्टला सकाळी 4.30 वाजता चाकरमान्यांना घेऊन रत्नागिरी स्थानकात दाखल होईल. या चाकरमान्यांची कडक तपासणी करण्यासाठी महसूल, आरोग्य व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. त्याचे नियोजन या यंत्रणेच्या माध्यामातून सुरु झाले आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकात उतरणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्क्रिनिंगद्वारे तर 50 वर्षावरील व्यक्तीची अँटीजेन तपासणी केली जाणार आहे. येणाऱ्या प्रत्येकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक घेतला जाणार असून मला कोणताही आजार नाही अशा हमीपत्रावर प्रवाशाची सही घेण्यात येणार आहे. तिकीट कन्फर्म असेल तर गाडीत प्रवाशांना जागा मिळणार आहे. 

निर्णयातून गोंधळ 
कोकणात येण्यासाठी चाकरमान्यांना दहा दिवसांचा क्‍वारंटाइन कालावधी राज्य शासनाकडून जाहीर केला आहे. तसेच त्यानंतर येणाऱ्यांना 48 तास आधीची कोरोना चाचणी केल्याचे सर्टीफिकेट आवश्‍यक आहे. एसटी, खासगी गाड्यांमधून अनेक चाकरमानी गावागावात दाखल झाले आहेत. गावातही क्‍वारंटाईनसाठी मुंबईकरांवर सक्‍ती आहेत. या परिस्थितीत गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या गाड्यांमधून चाकरमानी आले तर त्यांना पुढे दहा दिवस राहावे लागेल. तोपर्यंत अर्धा गणेशोत्सव पूर्ण होईल. येणारे चाकरमानी आधीच दाखल झाल्यामुळे विशेष गाड्यांचा फायदा कोणाला होणार हा प्रश्‍नच आहे. गाड्या सोडण्याच्या या निर्णयावर चाकरमान्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 162 Ganeshoushav Special Konkan Railway Trains Announcement