पिंपळी आयटीआयमधील 17 विभागप्रमुख पदे रिक्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

कौशल्य विकासातून रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयटीआयचे विस्तारीकरण झाले. आणि  त्यातून तालुका पातळीवर आयटीआय ही संकल्पना अंमलात आणली गेली. 

चिपळूण (रत्नागिरी)  : कान्हे पिंपळी येथील शासकीय आयटीआय कॉलेजमध्ये प्राध्यापकांची 17 पदे रिक्त आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य हे पदही रिक्त आहे. तासिका तत्त्वावर 16 कंत्राटी प्राध्यापक आयटीआयचा कारभार चालवत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

कौशल्य विकासातून रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयटीआयच्या विस्तारीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. तालुका तेथे आयटीआय ही संकल्पना अंमलात आणली गेली. त्यानुसार चिपळूण तालुक्‍याचे आयटीआय 1969 मध्ये कान्हे पिंपळी येथे सुरू झाले. सद्यस्थितीत येथे 23 प्रकारचे अभ्यासक्रम चालतात.

हेही वाचा - गाव - शिवाराला पारखी झाली फुलपाखरं, पण कशामुळे ?
आयटीआयचे प्राचार्यपद रिक्त

सर्वच अभ्यासक्रमासाठी येथे पुरेसे विद्यार्थी आहेत. मात्र, 7 विषयांचे विभागप्रमुख कायमस्वरूपी आहेत. 17 विषयांचे विभाग प्रमुख कंत्राटी आहेत. आयटीआयचे प्राचार्यपदही रिक्त आहे. गुहागर आयटीआयच्या प्राचार्यांकडे चिपळूण आयटीआयचा प्रभारी कारभार सोपविण्यात आला आहे. 

 हेही वाचा - जनतेच्या आग्रहाखातर भाजपने यांना दिली उमेदवारी
 

शासकीय प्रमाणपत्राला अधिक महत्त्व

केंद्र सरकारने मेक इन इंडियाचा नारा दिला आहे. औद्योगिक जगतालाही कौशल्यप्राप्त कामगारांची गरज आहे. हे काम आयटीआयमधून होणे अपेक्षित आहे. खासगी आयटीआयपेक्षा शासकीय आयटीआयच्या प्रमाणपत्रालाही अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे शासकीय आयटीआयमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची नेहमीच झुंबड उडालेली असते.

रिक्त पदामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

चिपळूण आयटीआय या संस्थेमधील कौशल्य व प्रशिक्षकाची (निदेशक) 17 पदे रिक्त आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या व्यवसाय शिक्षणावर जाणवू लागला आहे. अतिरिक्त संस्थांचा कारभार सांभाळताना कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे

शासकीय आयटीआयचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याची गरज 

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्‍यता आहे. औद्योगिक यंत्रणेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. चिपळूण आयटीआयची इमारतही नादुरुस्त आहे. येथे पाण्यासह अनेक गैरसोयी आहेत. त्यामुळे शासकीय आयटीआयचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याची गरज आहे. त्या शिवाय विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधाही पुरवण्याची गरज आहे. 
-सुशांत पवार, कान्हे पिंपळी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 17 ITI CEO Post Is Empty In Pimpali