यंदा कोकणात भात खरेदी @ १,८६८ रुपये

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

जिल्ह्यात लवकरच धान्य खरेदी प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती फेडरेशनचे जिल्हा पणन अधिकारी प्रभाकर चिले यांनी दिली.

रत्नागिरी : मार्केटिंग फेडरेशनकडून खरेदी करण्यात येणाऱ्या भातासाठी शासनाने यंदा प्रतिक्‍विंटल एक हजार ८६८ रुपये दर निश्‍चित केला आहे. गतवर्षी हाच दर एक हजार ८१५ रुपये होता. जिल्ह्यात लवकरच धान्य खरेदी प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती फेडरेशनचे जिल्हा पणन अधिकारी प्रभाकर चिले यांनी दिली.

हेही वाचा -  पावसाचा जोर वाढणार; रायगड, सिंधुदुर्गमध्ये रेड ऍलर्ट -

जिल्ह्यात भातपीक खरेदी योजनेला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा खरेदी- विक्री संघ आणि विविध कार्यकारी सोसायटी यांच्यामार्फत धान्याची खरेदी करण्यात येते. यासाठी खेड, दापोली, केळशी, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्‍वर, लांजा, राजापूर, पाचल, चिपळूण, मिरवणे, आकले, शिरगाव, शिरळ अशा १४ केंद्रांवर भाताची खरेदी केली जाते. यंदा दोन केंद्रे वाढवण्यात येणार आहेत. खरेदी केलेला भात जिल्हा पुरवठा विभागाच्या ताब्यात दिला जातो. यानंतर हा भात भरडण्यासाठी टेंडर काढण्यात येत. 

भात भरडल्यानंतर तयार झालेला तांदूळ जिल्ह्यात वितरीत केला जातो. जिल्ह्यात २०१३-१४ मध्ये विक्रमी प्रतिसाद लाभला होता. त्यावर्षी २४ हजार ४९८.४६ क्‍विंटल भाताची खरेदी झाली. त्यासाठी शासनाने एक हजार ३१० रुपये दर दिला होता. त्यावेळी जिल्ह्यातील एक हजार ९५९ शेतकऱ्यांनी आपल्याकडील भाताची विक्री केली होती. हा भात गोडावूनमध्ये शिल्लक राहिल्याने पुढील दोन वर्षे भाताची खरेदीच झाली नव्हती.

गतवर्षी १५ हजार १९१ क्‍विंटल भाताची विक्री केली होती. मार्केटिंग फेडरेशनने क्‍विंटलला एक हजार ७५० रुपये दराने याची खरेदी केली होती. गतवर्षी शेतकऱ्यांना प्रतिक्‍विंटल ७०० रुपये बोनसही दिला गेला. मात्र हा बोनस ५० क्‍विंटलपर्यंतच मर्यादित होता.

हेही वाचा - कोकणात मुसळधार पावसाने धुमाकुळ : विजच्या धक्क्याने एक महिला मृत तर दोन जण बेशुध्द -

हंगाम खरेदी दर

वर्ष         भात (क्‍विंटल)    दर रुपये
२०१०-११      १५,२६०         १,०००
२०११-१२      १८,७३१         १,०८०
२०१२-१३      २१,६८०         १,२५०
२०१३-१४      २४,४९८        १,३१०
२०१४-१५      ००.०००         १,३६०
२०१५-१६      ००.०००         १,४१०
२०१६-१७      ०८,५५६        १,४७०
२०१७-१८      ०८,१२२          १,५५०
२०१८-१९       १३,२९५         १,७५०
२०१९-२०       १५,१९१          १,८१५

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1868 rupees for quintal rice sales for this year in ratnagiri from marketing federation