गणेशोत्सवासाठी कोकणात 2 हजार 200 जादा बसेस; ग्रुप बुकींग 20 जुलैपासून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

  • यंदा गणेशोत्सवासाठी  कोकणात जाणाऱ्या मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांना एसटीकडून तब्बल 2 हजार 200 जादा बसेसची सोय
  • परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांची माहिती. 
  • 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत गणेश उत्सवाची पहिल्या टप्प्याची जादा वाहतूक
  • 27 जुलैपासून संगणकीय आरक्षण उपलब्ध. परतीच्या प्रवासाचेही आरक्षण उपलब्ध.
  • 20 जुलै पासून ग्रुप बुकींगला सुरूवात

मुंबई - यंदा गणेशोत्सवासाठी  कोकणात जाणाऱ्या मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांना एसटीने तब्बल 2 हजार 200 जादा बसेसची सोय केली आहे. या सेवेचा त्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले आहे.

28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत गणेश उत्सवाची पहिल्या टप्प्याची जादा वाहतूक  करण्यात येणार आहे. येत्या 27 जुलै (एक महिना अगोदर) पासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, यावर्षीपासून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे देखील आरक्षण एकाचवेळी म्हणजे 27 जुलैपासून करता येणार आहे.

20 जुलै पासून ग्रुप बुकींगला सुरूवात..

गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी मुंबईतील चाकरमानी गटागटाने बस आरक्षित करतात. मुंबईतल्या विविध उपनगरातील लोक एकत्र येऊन कोकणातील एकाच गावी किंवा सलग असणाऱ्या गावात जाण्यासाठी एसटीची बस आरक्षित करतात, ही बस त्यांना सोयीची ठरते. गेली कित्येक वर्षे एसटी या चाकरमान्यांना त्यांच्या मुंबईतल्या घरापासून ते कोकणातील त्यांच्या वाडी वस्ती व गावापर्यंत सुखरूप आणि सुरक्षितपणे नेऊन सोडत आली आहे. अशा गट आरक्षणाला (ग्रुप बुकिंगला) 20 जुलैपासून सुरुवात होत आहे. संबंधित लोकांनी ग्रुप बुकिंगसाठी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात येत आहे.

14 ठिकाणाहून जादा बसेस सुटणार..

28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील 14 बसस्थानके व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच परतीच्या प्रवासासाठी म्हणजेच 7 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत कोकणातील स्थानिक बसस्थानकावरून जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. कोकणातील महामार्गावर ठिक - ठिकाणी वाहन दुरुस्ती पथके (ब्रेक डाउन व्हॅन) तैनात करण्यात येणार असून प्रवाशांना प्रवासात तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 more 200 buses in Konkan for Ganeshotsav; Group bookings from July 20