
रत्नागिरी : १०२ साकवांसाठी २३ कोटी वितरित करणार!
रत्नागिरी : जिल्ह्यात २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत वाहुन गेलेल्या जिल्ह्यातील १०२ साकवांची पुनर्बांधणी आणि मजबुतीकरणासाठी २३ कोटी ४५ लाखाची निधी लवकरच वितरित होणार आहे. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब आणि खासदार विनायक राऊत यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. तातडीने हा निधी वितरित केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. जिल्ह्यात २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत साकव मोठ्या प्रमाणात नादुरूस्त झाले आहेत तर काही वाहुन गेले आहेत.
त्यामुळे बऱ्याच ठिकाणी गावे, वाड्यांचा संपर्क तुटला आहे. विशेषतः पावसाळ्यामध्ये नद्या, नाले, ओढे यांना मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने ग्रामस्थ व शाळकरी विदयार्थ्यांना अन्य पर्यायी मार्ग नसल्याने ये-जा करण्यासाठी किंवा वाहतुकीच्यादृष्टीने अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे क्षतिग्रस्त झालेल्या तसेच वाहुन गेलेल्या साकवांच दुरूस्ती, पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. गेल्या महिन्यात यासदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सावकवांच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार २०२१ च्या अतिवृष्टीमध्ये नादुरूस्त झालेल्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडीन ३९ साकवांसाठी १४ कोटी ९ व जिल्हा परिषद चिपळूण कडील ६३ साकवांसाठी ९ कोटी ३५ लाख असा एकुण १०२ साकवांच्या दुरूस्ती आणि पुनर्बांधणीसाठी २३ कोटी ४५ लाख निधीची आवश्यकता आहे, तरी त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, असा प्रस्ताव देण्यात आला होता.
त्या अनुषंगाने आज जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब आणि खासदार विनायक राऊत यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. त्यांनी २३ कोटी ४५ लाखाचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावर श्री. वडेट्टीवार यांनी तातडीने हा निधी वितरीत करण्याचे आश्वासन दिल्याचे राऊत यांनी सांगितले.
Web Title: 23 Crore Will Distributed For 102 Sakvas Vijay Namdevrao Wadettiwar Vinayak Raut Anil Parab Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..