
कळंबणीनजीक अपघात; २५ विद्यार्थ्यांचा समावेश
खेड (रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणीनजीक एक विचित्र अपघात पाहायला मिळाला. २५ विद्यार्थी व ३ प्रवासी असलेली एसटी बसच्या अपघाताने अक्षरश: बघ्यांच्या अंगावर काटा आणला. कशी घडली नेमकी ही थरारक घटना?
विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आले.
कळंबणी उपजिल्हा रुग्णालयानजीक प्रवाशी घेण्यासाठी तुळशी -खेड ही वस्तीची बस परतीच्या प्रवासात रस्त्याच्या कडेला थांबली असता मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या कंटेनरने एसटीला पाठीमागून ठोकर दिली. या अपघातात बसमधून प्रवास करणाऱ्या ४६ प्रवाशांपैकी २८ प्रवासी जखमी झाले. यामध्ये अमिषा संतोष पाटील या विद्यार्थिनीला अधिक उपचारासाठी चिपळूण येथे दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना एसटीचे वाहक संजय साळवी यांच्यासह जखमी उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा- भन्नाट स्टोरी: गेल्या 15 वर्षांपासून एक कावळा येतो आणि दररोज दाराची कडी वाजवतो
एकूण २८ प्रवाशी जखमी
मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणीनजीक तुळशी-खेड एसटी बसला (क्र. एमएच. २०. बीएल. २५८०) गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरने (क्र.-एमएच. ४७. बीबी. ४७३१) पाठीमागून धडक दिल्याने बसमधील वाहकासह २५ विद्यार्थी व ३ प्रवासी असे एकूण २८ प्रवाशी जखमी झाले आहेत. हा अपघात महामार्गावर कळंबणी येथे आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची माहिती मिळताच आमदार योगेश कदम यांनी आरोग्य यंत्रणा व पोलिस प्रशासनाला घटनास्थळी दाखल होण्याचे आदेश दिले. आमदार योगेश कदम यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच कळंबणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये जखमी विद्यार्थ्यांची त्यांनी भेट घेऊन विचारपूस केली.
संपादन- अर्चना बनगे