295 वर्षांच्या किल्ल्याला मिळणार नवी उभारी...

295 year old castle will be erected in Purnagad  kokan marathi news
295 year old castle will be erected in Purnagad kokan marathi news

पावस (रत्नागिरी) : मजबूत तटबंदी, सुंदर समुद्रकिनारा, समोरचे गावखडीचे सुरूबन अशी गेली कित्येक वर्षांची साक्ष देणारा पूर्णगड किल्ला परिसर पर्यटकांना आकर्षित करत आहे. हा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या सहकार्याने 5 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून किल्ला संवर्धन करण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर बांधकाम सुरू आहे. येत्या काही दिवसांत हा किल्ला पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण बनणार आहे. 

खाडी किनाऱ्यावरून जाणारा रस्ता लोकप्रतिनिधींनी निधी उपलब्ध करून दिल्यास पर्यटक समुद्राचा आस्वाद घेत किल्लाला भेट देऊ शकतील. सेनाप्रमुख सखोजी आंग्रे यांनी सन 1725 च्या सुमारास किल्लेदार धुळप (विजयदुर्ग) यांच्याकडून या किल्ल्याचे बांधकाम करून घेतले होते. त्यावेळी रत्नागिरी व जैतापूर दरम्यान टेहेळणी करण्यासाठी या किल्ल्याची (गढी) बांधणी करण्यात आली. 1750 मध्ये धापडसी (जि. सातारा) येथील ब्रह्मेंद्र स्वामी यांनी किल्ल्यात शंकराचे देऊळ बांधले. त्याचबरोबर त्यांनी डोर्ले, परशुराम, कात्रज येथेही शंकराची मंदिरे बांधली. पूर्वीच्या काळी संपूर्ण परिसर विजयदुर्ग कार्यालयाच्या अखत्यारित होता.

पूर्णगड किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी

संपूर्ण कारभार तेथून चालत होता. त्यावेळी पूर्णगड हे गाव नव्हते. येथे गाव व बाजारपेठ बसवण्यासाठी 1774 मध्ये गणेशगुळे येथील भिकाजी नारायण फडके यांना पेशवेकाळात सनद देण्यात आली. त्यानंतर या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाले होते. या किल्ल्याची समुद्राकडील तटबंदी कोसळली होती. किल्ल्यात झाडेझुडपे वाढली होती. पुरातत्त्व विभागाला किल्ले संवर्धन कार्यक्रमांतर्गत पूर्णगड किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी पाच कोटीचा निधी प्राप्त झाल्याने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गडाच्या तटबंद्या मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. तटबंदीवर वाढलेली झाडेझुडपे तोडण्यात आली आहेत. 

हेही वाचा- खासगी बसमध्ये सापडला हा साठा : तिघांना अटक

कोठार, चावडी, वृंदावन संरक्षित.. 
किल्ल्यात पर्यटकांना फिरण्यासाठी बुरजावरील व आतील वाटा (पातवे) चिरेबंदी करण्यात आल्या आहेत. तसेच किल्ल्याच्या सभोवताली चिरेबंदी पायवाटा बांधण्यात आल्या आहेत. किल्ल्याचा मुख्य दरवाजा व समुद्राकडील दरवाजा मजबूत लाकडाचा करण्यात आला आहे. समुद्रदर्शन व परिसराचा आनंद लुटण्यासाठी कठडे संरक्षित करण्यात आले आहेत. किल्ल्यातील कोठार, चावडी, वृंदावन आदीला संरक्षित करण्याचे काम सुरू आहे. 

हेही वाचा- ऐन काजू हंगामात आला हा आजार ; उपायासाठी वाचा....
 
मूळ वास्तूला बाधा न आणता जतन : युनूस 

किल्ला दुरुस्तीचे काम करून घेणारे सय्यद युनूस म्हणाले, आम्ही पुरातत्त्व विभागाच्या आदेशानुसार ऐतिहासिक वास्तूला बाधा न आणता ते आहे, तसे जतन करण्यासाठी काम करीत आहोत. चांगल्या कामामुळे पर्यटक समाधान व्यक्त करीत आहेत. यापूर्वी औसा, तोरणा, लोणावळा आदींच्या संवर्धनाचे काम केल्यामुळे पूर्णगडचे काम हाती घेतले आहे. त्याला आकार देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे संवर्धन केल्यानंतर एक चांगले पर्यटनस्थळ ठरण्याची शक्‍यता आहे. 

एक दृष्टिक्षेप.... 
* पाच कोटीच्या निधीतून दुरुस्ती 
* पायवाटा चिरेबंदी 
* कोठार, चावडी, वृंदावनही होणार सुशोभित 
* दर्जेदार रस्ता होण्याची अपेक्षा  

 
 
 

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com