खासगी बसमध्ये सापडला 'हा' साठा : तिघांना अटक

ammunition seized from private buses in karur kokan marathi news
ammunition seized from private buses in karur kokan marathi news

वैभववाडी (सिंधुदूर्ग) : गोव्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या खासगी आराम बसमध्ये गोवा बनावटीची १ लाख ४५ हजार २०० रुपये किमतीची दारू आढळुन आली. याप्रकरणी पोलिसांनी चालकासह दोघांना अटक केली असून ३५ लाख रुपये किमतीची बसदेखील ताब्यात घेतली आहे. ही कारवाई करूळ तपासणी नाक्‍यावर आज पहाटे चारच्या सुमारास करण्यात आली.

अटक केलेल्यांमध्ये धनराज गोपाळराव बोरफळे (वय ३७, रा.जेवरी, लातुर), नागेश प्रदीप संकपाळ (वय ४५ रा. भैरवनाथ, रायगड), बाबु रामराव मठाळे (वय ३०, रा. निलंगा, लातूर) यांचा समावेश आहे. कृष्णांत लक्ष्मण पडवळ आणि वाय. व्ही. तांडेल हे पोलीस कर्मचारी करूळ तपासणी नाक्‍यावर काल (ता. ८) ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करीत होते. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास गोव्याहुन कोल्हापुरकडे निघालेली व्होल्वो बस (क्रमांक एम.एम.१४, सीयु-८८६७) ही गाडी तपासणी नाक्‍यावर आली. पोलीसांनी इतर वाहनांप्रमाणे या गाडीची देखील झडती घेण्यास सुरूवात केली. 

गाडीची तपासणी करीत असताना गाडीच्या सामान ठेवण्याच्या जागेत पोलीसांना संशयास्पद बॉक्‍स दिसून आले. त्यांनी चालकाला बॉक्‍स बाहेर काढण्यास सांगितले. बॉक्‍स उघडुन पाहीले असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या आढळुन आल्या. पोलिसांनी गाडीतील १४ बॉक्‍स बाहेर काढण्यास सांगितले. या सर्व बॉक्‍समध्ये गोवा बनावटीची १ लाख ४५ हजार २०० रुपये किमतीची दारू सापडली.

ही माहिती पोलिसांनी तत्काळ पोलिस स्थानकात दिली. त्यानंतर इतर कर्मचारी देखील करूळ तपासणी नाक्‍यावर पोहोचले. त्यांनी पंचासमक्ष मुद्देमाल ताब्यात घेतला. त्यानंतर तीनही संशयित आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान पोलीसांनी बसही ताब्यात घेतली आहे. गाडीतील प्रवाशांना इतर बसमधून पाठविण्यात आले. अटक करण्यात आलेल्या तिघांना मंगळवारी (ता. ११) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार राजू जामसंडेकर करीत आहेत.

बस आणि गोवा बनावटीची दारू
गोव्याहून कोल्हापूर-पुणे मार्गे मुंबईला जाणाऱ्या खासगी बसमधून गोवा बनावटीच्या दारूची सर्ऱ्हास वाहतूक केली जाते. हे यापूर्वी अनेकदा स्पष्ट झाले आहे. प्रवासी वाहतुकीच्या नावाखाली राजरोसपणे अशा पद्धतीने वाहतूक केली जाते. दारूच्या बाटल्या लपविण्यासाठी बसमध्ये पोलिसांना सहज दिसणार नाही अशा जागा बनविल्या गेल्या आहेत. या मार्गावर करूळ तपासणी नाक्‍यानंतर पुढे कुठेही तपासणी होत नसल्यामुळे अवैद्य वाहतूक करणारे सर्वच या मार्गाचा वापर करताना दिसत आहेत.


...तर दररोज एक कारवाई
विधानसभा निवडणूक आचारसंहिता काळात करूळ तपासणी नाक्‍यावर एका आठवड्यात अवैद्य दारू वाहतुकीवर तिनदा कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर मात्र तितक्‍या प्रमाणात कारवाई झालेली नाही. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात दारू वाहतूक सुरू असते. पोलिसांनी कारवाईच करायचे ठरविले तर दररोज एक कारवाई करूळ तपासणी नाक्‍यावर होऊ शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com