गुडघ्याला बाशिंग बांधलेल्यांचा हिरमोड; महिलांनीच मारली बाजी 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

आधीच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक पुरुष उमेदवारांचा चांगलाच हिरमोड झाला आहे

लांजा - नुकत्याच झालेल्या तालुक्‍यातील 23 ग्रामपंचायती व पुढील दोन महिन्यांनी मुदत संपणाऱ्या 37 ग्रामपंचायती अशा एकूण 60 ग्रामपंचायतींपैकी 30 ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. 30 ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित झाल्याने आधीच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक पुरुष उमेदवारांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. सरपंचपदाचे आरक्षण सोडत शहरातील सांस्कृतिक भवन येथे पार पडली. 

60 ग्रामपंचायतींपैकी 30 ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. 8 ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्ग, 8 ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, 2 ग्रामपंचायती अनुसूचित जाती तर 2 ग्रामपंचायती अनुसूचित जाती स्त्री या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत. 20 ग्रामपंचायती सर्वसाधारण गटासाठी खुल्या राहिल्या आहेत.

तालुक्‍यातील 23 ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीनंतर गेले 10 दिवस लक्ष लागून राहिलेली हूर हूर अखेर सोमवारी काढण्यात आलेल्या सरपंचपदाच्या अरक्षणाने संपुष्टात आली. तालुक्‍यातील 60 ग्रामपंचायतींपैकी 30 ग्रामपंचयती महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. यामध्ये आडवली, आसगे, इसवली, उपळे, कणगवली, कुर्णे, कोचरी, कोट, खावडी, जावडे, झापडे, तळवडे, निवसर, पन्हळे, पालू, प्रभानवल्ली, बेनीखुर्द, भडे, भांबेड, माजळ, वाघणगाव, वाडगाव, वेरळ, वेरवली बुद्रुक, विलवडे, विवली, शिपोशी, शिरवली, सालपे, हर्चे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींवर महिला सरपंच विराजमान होणार आहेत. 

अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी वेरळ आणि निवसर या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. तर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी कोंडगे आणि गवाणे या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी वेरवली खुर्द, आरगाव, गोविळ, कोल्हेवाडी, साटवली, पुनस, खानवली, वाघ्रट, तळवडे, कोचरी, भडे, वेरवली बुद्रुक, इसवली, प्रभानवल्ली, कुर्णे, विलवडे या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. सर्वसाधारणसाठी आगवे, आंजणारी, इंदवटी, कुरचुंब, कुरंग, कोंडये, कोलधे, कोर्ले, खोरनिनको, गोळवशी, देवधे, बेनी बुद्रुक, मठ, रावारी, रिंगणे, रुण, वनगुळे, वाकेड, व्हेळ, हर्दखळे या ग्रामपंचायती खुल्या राहिल्या आहेत.

याप्रसंगी आमदार राजन साळवी, लांजा तहसीलदार पोपट ओमासे, निवासी नायब तहसीलदार उज्वला केळुसकर, गटविकास अधिकारी यशवंत भांड, सभापती लीला घडशी आदी उपस्थित होते.  

हे पण वाचा जंगल सफारी करताना वाघ बघायचा आहे
 
आरक्षण न पडलेल्या प्रथम
जि. प लांजा शाळा क्रमांक 5 या शाळेतील इयत्ता सहावीतील कु. हर्षदा देवेंद्र उत्तेकर या विध्यार्थीनीच्या हस्ते सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीच्या चिठ्या काढण्यात आल्या. यावेळी 15 ते 20 वर्ष आरक्षण न पडलेल्या ग्रामपंचायतींपासून प्रथम आरक्षण सोडतीला सुरुवात झाली.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 30 gram panchayat reservation women in ratnagiri lanja