सिंधुदुर्गात पावसाचा कहर; सावंतवाडीत 370 मिलीमीटर पाऊस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

  • सिंधुदुर्गात आज पावसाचा कहर
  • अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील बहुसंख्य भागात पुरस्थिती
  • पुरात सापडून जिल्ह्यात तिघेजण बेपत्ता
  •  बांदा, खारेपाटण या शहरांना पुराचा सर्वाधिक तडाखा
  • मुंबई-गोवा महामार्गासह जिल्ह्यातील बहुसंख्य घाट मार्ग ठप्प 

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गात आज पावसाने कहर केला. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील बहुसंख्य भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुरात सापडून जिल्ह्यात तिघेजण बेपत्ता झाले. अनेक घरांना पुराच्या पाण्याने वेढले. बांदा, खारेपाटण या शहरांना पुराचा सर्वाधिक तडाखा बसला. मुंबई-गोवा महामार्गासह जिल्ह्यातील बहुसंख्य घाट मार्ग ठप्प झाल्याने तळकोकणचा पश्‍चिम महाराष्ट्राशी असलेला संपर्क विस्कळीत झाला. गेल्या चौवीस तासात सावंतवाडी तालुक्‍यात सर्वाधिक 370 मिलीमीटर इतक्‍या विक्रमी पावसाची नोंद झाली. उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम असल्याने पुरस्थिती आणखी गंभीर होण्याची भिती होती. 

जिल्ह्यात गेले चार दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. कालपासून याची तीव्रता वाढली. काल सायंकाळपासूनच पुराच्या पाण्याने धोक्‍याची पातळी ओलांडायला सुरूवात केली. आज सकाळपासून याची तीव्रता अधिकच वाढली. अनेक कुटुंब पुरात अडकली. त्यांना शिताफीने बाहेर काढण्यात आले. 

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 205.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कर्ली आणि तिलारी नदीने इशारा पातळी ओलांडली असून सरंबळ, मळगाववाडी, बांदा, शेर्ले भागात पुराचे पाणी भरले. बांदा येथील इमारतींमध्ये अडकलेल्या रहिवाश्‍यांना सुरक्षीत स्थळी स्थलांतरीत करण्यात आले.

जिल्ह्यातील कणकवली - आचरा, एडगाव - वैभववाडी, लोरे - फोंडा या मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली. वैभववाडी तालुक्‍यात करुळ नदीला आलेल्या पुरामुळे वैभववाडी - गगनबावडा (करुळ घाट मार्गे) रस्ता बंद झाला. कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती असल्यामुळे कोकणात येणारे फोंडा, करुळ आणि आंबोली मार्ग बंद झाले आहेत. खारेपाटण आणि राजापूर येथे पाणी आल्यामुळे रत्नागिरीशी असणारा संपर्कही तुटला आहे. 

नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यासाठी कुडाळ येथे तीन, मालवण येथे दोन व कणकवली येथे एक नौका तैनात आहे. कुडाळ व वेताळबांबर्डे येथे महामार्गावर पाणी आल्याने मुंबई - गोवा माहामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरड कोसळल्यामुळे आंबोली घाट मार्ग बंद झाला आहे. खारेपाटण शहराला वाघोटन नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. दक्षतेचा उपाय म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफचे पथक तैनात केले आहे. कुडाळ येथे लक्ष्मीवाडी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या पाच नागरीकांची सुटका करण्यात आली आहे. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेला पावसाने सरासरी ओलांडली असून 1 जून 2019 ते आजपर्यंत 2800.03 मिलीमीटर एकूण सरासरी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत एकूण 2455 मिलीमीटर सरासरी पाऊस झाला होता. जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असून तिलारी आंतरराज्य प्रकल्प 93.07 टक्के भरला आहे. सध्या या धरणामध्ये 416.3650 दशलक्ष घनमीटरपाणीसाठा झाला आहे.

देवघर मध्यम प्रकल्प 95.13 टक्के भरला असून या धरणाच्या आठ दरवाज्यांमधून सध्या 64.45 घनमीटर प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे. यंदाच्या वर्षी घळभरणी झालेल्या अरूणा प्रकल्पामध्ये 104 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. 19 लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरले आहेत. तिलारी व कर्ली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कर्ली नदीची सध्याची पातळी 30 फूट असून इशारा पातळी 29 फुट आहे. धोका पातळी 31 फुट असून पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच कर्ली नदी धोक्‍याच्या पातळीवरून वाहू लागले. 

कणकवली तालुक्‍यात फोंडाघाट आणि करूळ घाट वाहतूकीस बंद होते. त्यामुळे एसटीच्या लांबपल्ल्याच्या सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. तालुक्‍यातील काही गावाच्या वीजपुरवठा ठप्प झाला आहे. शहरातील काही भाग अंधारात आहे. फोंडाघाट ते वैभववाडी, कणकवली ते तरंदळे, कणकवली सातरल ते मालवण, कणकवली ते नरडवे आणि कणकवली ते आचरा हे मार्ग पाणी आल्यामुळे बंद होते. कणकवली शहरातील वरचीवाडी येथे पुराचे पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्‍यात वीज पुरवठा खंडित झाला होता.

शहरातील काही भागात वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटल्याने वीजप्रवाह दूरध्वनी सेवा खंडित झाली होती. कणकवली आचरा मार्ग पूर्णतः ठप्प होतात. खारेपाटण येथे पुराचे पाणी आल्याने नागरिकांना स्थलांतरित करण्याची वेळ प्रशासनावर येण्याची शक्‍यता आहे. देवधर मध्यम पाटबंधारे प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने लोरे, वाघेरी या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

पुरात अडकलेल्यांच्या सुरक्षेचे मिशन फत्ते 
जिल्ह्यात ठिकठिकाणी पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना स्थानिक आणि प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले. यासाठी होड्यांचा वापर करण्यात आला. दोडामार्ग तालूक्‍यातील आवाडे येथील एका कूटूंबातील पाच माणसे, इन्सुली बिलेवाडी येथील आठ कुटूंबातील 12 व्यक्तींना तर कुडाल लक्ष्मीवाडी येथील पाच जणांना घरात पाणी घुसल्याने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. बांदा, खारेपाटण या भागातही अनेकांना वाचवण्यात यश आले. 

पुराच्या पाण्यात तिघे बेपत्ता 
जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. यात सांगवे येथील मनोहर रामचंद्र कांबळे नदीच्या पाण्यात वाहून गेले होते. त्यांचा मृतदेह सापडला आहे. उंबर्डे येथील महेंद्र कदम व चेंदवन येथील भाग्यश्री भालचंद्र पिंगुळकर यांचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. ही माहीती निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापण अधिकारी राजश्री सामंत यांनी दिली. 

""जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे; मात्र कोठेही स्थिती नियंत्रणाबाहेर नाही. यामुळे घाबरून जावू नये. मुंबई- गोवा महामार्गावर पावशी, वेताळबांबर्डे, वागदे या ठिकाणी पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली असून तिलारी धरण धोक्‍याची पातळी गाठणार असल्याने खबरदारी म्हणून एनडीएएफची 30 जणांची तुकडी मागविण्यात आली आहे. ती आज जिल्ह्यात दाखल होईल.'' 
- डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग 

असा बरसला पाऊस 
(तालुकावार आज सकाळी संपलेल्या 24 तासातील आकडे मिलीमीटरमध्ये, कंसात एकूण पाऊस) 
* दोडामार्ग 183 (3110), * सावंतवाडी 370 (2798), * वेंगुर्ले 201.2 (2977.26), * कुडाळ 172(2635), 
* मालवण 90 (2344), * कणकवली 265(3095), * देवगड 102 (2147), * वैभववाडी 260(3294) 

जिल्हाभरात.......... 
* गतवर्षीची सरासरी पावसाने ओलांडली 
* पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणारे सर्व घाटमार्ग बंद 
* खारेपाटण, राजापूरला पाणी आल्याने रत्नागिरीशी संपर्क तुटला 
* पावशी, वेताळबांबर्डे, वागदेत पुराचे पाणी महामार्गावर आल्याने वाहतुक ठप्प 
* कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुक सुरू 
* बांदा, खारेपाटण शहरांना सर्वाधिक फटका 
* बहुसंख्य धरणांमधून विसर्ग वाढल्याने नद्यांनी धोका पातळी ओलांडली 
* समुद्राच्या उधाणाची तीव्रता वाढली 
* महेंद्र धाकला कदम उंबर्डे येथील कॉजवेवरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात सापडल्याने बेपत्ता 
* वैभववाडी-फोंडा मार्ग लोरे येथील शिवगंगा नदीवरील पुलावर पाणी आल्याने ठप्प. 
* वैभववाडी-उंबर्डे मार्ग एडगाव, सोनाळी, कुसुर येथे पुराचे पाणी आल्याने बंद 
* खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील जामदा पुलावर पाणी 
* एडगाव फौजदारवाडी मातीचा ढिगारा, झाडे रस्त्यावर 
* पुरस्थिती गंभीर असल्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी 
* तिथवली न्हाऊळदेववाडीत पुराचे पाणी घुसले 
* देवधर, तिलारी धरणातील विसर्ग वाढल्याने खालच्या भागात धोका 
* अनेक मार्गावरील एसटी बस फेऱ्या बंद 
* आंबेरीसह माणगाव खोऱ्यातील बऱ्याच पुलावर पाणी आल्याने अनेक गावे संपर्कहिन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 370 MM rains in Sawantwadi Taluka three missing