दिलासादायक : रत्नागिरीत दोन महिन्यात आढळले सर्वात कमी कोरोना बाधित

राजेश कळंबट्टे
Sunday, 4 October 2020

चोविस तासात 38 रुग्ण; दोन दिवसात 3 मृत

रत्नागिरी :कोविडचा उद्रेक झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यात बाधित रुग्ण सापडण्याची सर्वात निचांकी नोंद रविवारी (ता. 4) रत्नागिरी जिल्ह्यात झाली. मागील चोविस तासात जिल्ह्यात अवघे 38 रुग्ण सापडले आहेत. तसेच दोन दिवसात मृत पावलेल्या तिघांची भर पडली असून एकुण मृतांचा आकडा 273 झाला आहे.

ऑगस्ट, सप्टेंबर या दोन महिन्यात कोरोना बाधित सापडण्याचे प्रमाण सर्वाधिक झाले होते. कोरोनाबाबत प्रतिबंधीत उपाययोजना काय कराव्यात याची माहिती शासनाकडून प्रसारीत केली जात आहे. नागरिकांमध्ये सतर्कता निर्माण झाली असून सोशल डिस्टीन्सिंग, मास्क यांचा सर्रास वापर सुरु आहे. त्याचबरोबर प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक ती औषधोपचार प्रत्येक जणं करत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. त्याचा परिणाम दिसून येत असून जिल्ह्यात कोरोना बाधित सापडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे. दिवसाला सरासरी दोनशे चाचण्या केल्या जातात. 

हेही वाचा- चिपळूणात यंदा गरबा नाहीच ; मंडळांचा निर्णय -

जिल्ह्यात रविवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 38 नवे बाधित सापडले आहेत. त्यात आरटीपीसीआर चाचणीत 14 तर अ‍ॅण्टीजेनमध्ये 24 रुग्ण बाधित होते. मंडणगड, खेड, गुहागर, संगमेश्‍वर, लांजा व राजापूर तालुक्यात एकही बाधित सापडलेला नाही. खेड 4, दापोली 11, चिपळूण 5, रत्नागिरी 18 रुग्ण बाधित आहेत. रत्नागिरी तालुक्यात शहरी भागामध्ये सर्वाधिक रुग्ण असून जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 7 हजार 669 बाधित रुग्ण झाले आहेत.

रुग्ण बरे होणार्‍यांचे प्रमाणही जिल्ह्यात 84 टक्केवर पोचले आहे. मागील दोन दिवसात तिन कोरोना बाधित मृत पावले असून त्यातील दोघांचा मृत्यू रविवारी झाला आहे. राजापुर, रत्नागिरी आणि दापोली या तिन तालुक्यातील ते रुग्ण असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. जिल्ह्यात एकुण मृत्यूसंख्या 273 झाली असून मृत्यू दर 3.50 टक्के आहे. गेल्या आठ दिवसात मृत्यूदराचा टक्का स्थिर असून त्यावर उपाययोजना करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 38 patients in twenty four hours 3 dead in two days in ratnagiri