esakal | Sindhudurga : डोसपासून ३८ हजार कणकवलीकर दूर
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

डोसपासून ३८ हजार कणकवलीकर दूर

sakal_logo
By
तुषार सावंत

कणकवली : तालुक्यात आजअखेर ९ हजार ८३८ कोरोना संक्रमित रुग्ण सापडले आहेत; मात्र दोन मात्रा घेणाऱ्या नागरिकांची संख्या अजूनही ४३ हजार ८२६ इतकीच आहे. तालुक्यातील १ लाख १८ हजार ८९७ लोकसंख्येच्या तुलनेत ८० हजार ४७२ नागरिकांनी कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक पहिला डोस घेतला आहे; मात्र अजूनही ३८ हजार ४१९ नागरिक पहिल्या डोसपासून दूर राहिले आहेत. त्यामुळे किमान पहिला डोस न घेतलेल्या नागरिकांची आता शोध मोहीम राबवावी लागणार आहे.

तालुक्यातील १०५ महसुली गावांतील ८५ टक्के महसुली गावे आजअखेर कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांनंतर तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळण्यास सुरुवात झाली आहे; मात्र बाजारपेठेतील गर्दीवरील, सार्वजनिक कार्यक्रमावरील नियंत्रण कायम राहिल्यास आणि येत्या काळातील नवरात्र उत्सवावरील निर्बंधांचे पालन झाल्यास तालुका कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यात जे नागरिक लसीकरणापासून दूर आहेत, त्यांच्यात जनजागृती करण्याची गरज आहे. खारेपाटण, फोंडाघाट येथील पोलिस नाक्यावर तपासणी बंद झाली आहे. रेल्वे स्थानकातही कोरोना चाचणी थांबविण्यात आली आहे.

एसटी बससेवा किंवा खासगी वाहनातील प्रवाशांना मर्यादा नाहीत. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे नागरिकांचा संपर्क वाढत आहे. तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आहे. कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे लसीकरणावर भर देण्याची गरज आहे. गेल्या तीन महिन्यांत चांगली मोहीम राबवल्याने पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या वाढली; पण दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांचा कालावधी असल्याने लसींची मात्रा अनेक गावात शिल्लक राहत आहेत. त्यात पहिला डोस घेणाऱे ३८ हजार नागरिक अजून वंचित आहेत.

आतापर्यंत तालुक्यातील हेल्थ वर्कर्सला पहिला डोस १७११ जणांनी घेतला असून दुसरा डोस १४०३ जणांनी घेतला आहे. फ्रन्टलाइन वर्करमध्ये पहिला डोस १८८३ तर दुसरा डोस ६३१ जणांना देण्यात आला आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांमध्ये पहिला डोस ३२ हजार ९९५ तर दुसरा डोस १२ हजार ६९५ जणांचा झालेला आहे. ४५ ते ६० वर्षे गटामध्ये पहिला डोस २५ हजार ३११ तर दुसरा डोस १५ हजार ५९३ जणांचा झालेला आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांमध्ये पहिला डोस १९ हजार ६७२ तर दुसरा डोस १३ हजार ५०४ जणांचा पूर्ण झाला आहे. तालुक्यात पहिला डोस पूर्ण झालेले एकूण ८० हजार ४७२ नागरिक असून दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ३४ हजार ८२६ इतकी आहे.

loading image
go to top