समुद्रकिनारे फुलले पर्यटकांनी ; गणपतीपुळेला ४० हजार भाविकांनी लावली हजेरी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 November 2020

कोरोनाचे नियम, निकषांकडे किनाऱ्यांवरील पर्यटकांकडून कानाडोळा केला जात असल्याने चिंता व्यक्‍त होते.

रत्नागिरी : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दुसरी लाट येण्याची भीती व्यक्‍त केली असतानाच दिवाळीची सुटी साजरी करण्यासाठी पर्यटक बिनधास्तपणे कोकणातील किनाऱ्यांवर उतरले आहेत. त्यामुळे किनारे फुलले असून, पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली. गेल्या आठवडाभरात गणपतीपुळेमध्ये सुमारे ४० हजार पर्यटकांनी भेट दिल्याचा अंदाज आहे. कोरोनाचे नियम, निकषांकडे किनाऱ्यांवरील पर्यटकांकडून कानाडोळा केला जात असल्याने चिंता व्यक्‍त होते.

गुहागर, दापोलीसह गणपतीपुळेतील किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहेत. दिवसाला साडेचार हजाराहून अधिक पर्यटक गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी येऊन जात आहेत. त्याचा फायदा मंदिर परिसरातील फेरीवाले, हॉटेल-लॉजिंग व्यावसायिकांना होत आहे. बहुतांशी पर्यटक हा सांगली, सातारा, कोल्हापूर येथील आहे. एका दिवसात गणपतीपुळेत दर्शन घेऊन ते माघारी जातात. त्यामुळे लॉजिंग, न्याहारी निवास याकडील कल ४० टक्‍केच आहे. गणपतीपुळे परिसरात हॉटेल-लॉजिंगसह छोटे-मोठे सुमारे तीनशेहून अधिक व्यावसायिक आहेत.

हेही वाचा - सावंतवाडीत नगरपालिकेच्या दवाखान्याला नगराध्यक्षांनीच ठोकले ताळे

कोरोनातील टाळेबंदीत त्यांचा व्यवसाय पूर्णतः बंद होता. या कालावधी पर्यटकच नसल्याने मोठा तोटा सहन करावा लागला. गेल्या आठ दिवसातील पर्यटकांचा राबता त्यांच्या पथ्थ्यावर पडला आहे. सात महिन्यातील तोटा भरुन निघाला नसला तरीही पैशाची रेलचेल सुरु झाल्याचे समाधान व्यावसायिक व्यक्‍त करत आहे. रविवारी पर्यटकांची गर्दी बऱ्यापैकी होती. पुढील आठवड्यात चौथा शनिवारी, रविवार आणि गुरुनानक जयंती अशा जोडून सुट्ट्या येणार असल्यामुळे पर्यटकांचा राबता असाच कायम राहण्याची शक्‍यता आहे. 

रांगेत अंतर ठेवून कशाला उभं राहायचं ?

शासनाने सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझर याचा अवलंब करावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. आम्ही आताच ट्रॅव्हल्समधून एकत्र आलो, आता रांगेत अंतर ठेवून कशाला उभं राहायचं, अशा प्रतिक्रियाही ऐकायला मिळत आहेत. अशा लोकांपुढे मंदिर व्यवस्थापनही हतबल झाले आहे.

"गणपतीपुळेत पर्यटकांची संख्या वाढली आहे. पण, लॉजिंग व्यावसायिकांना त्याचा ४० टक्‍केच फायदा झाला."

- प्रमोद केळकर, हॉटेल्स ॲण्ड टुरिझम असोसिएशन, गणपतीपुळे

हेही वाचा -  काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अंडरस्टॅंडिंग

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 40000 people visit to ganpatipule its beneficial for tourism increasing in ratnagiri