अजबच! मृत्यूनंतरही ४१८ जणांना मिळतीये पेन्शन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

आंजर्ले येथील सुमारे २ लाख ९४ हजार इतकी रक्‍कम परत करावी, अशी मागणी पोस्ट खात्याकडे केली आहे.

दाभोळ (रत्नागिरी) : दापोली तालुक्‍यातील शासकीय योजनांचे लाभ घेणाऱ्यांची झाडाझडती करण्यात आल्यावर धक्कादायक माहिती हाती आली आहे. लाभार्थ्यांपैकी ४१८ जण मृत झाले आहेत. मात्र, त्यांच्या नावावर लाभ उकळले जात आहेत. यातूनच आंजर्ले पोस्टात गैरव्यवहार करण्यात आले. आंजर्ले येथील सुमारे २ लाख ९४ हजार इतकी रक्‍कम परत करावी, अशी मागणी पोस्ट खात्याकडे केली आहे.

दापोली तालुक्‍यातील आंजर्ले पोस्ट कार्यालयातून मृत पावलेल्या शासकीय लाभार्थ्यांच्या बचत खात्यातून बनावट सही करुन रक्‍कम काढून त्याचा अपहार केल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात केल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडून विविध योजनांचा लाभ घेणारे लाभार्थ्यापैकी मृत पावलेल्या लाभार्थ्यांचे सोशल ऑडिट करण्याचे आदेश तहसीलदार दापोली यांना दिले. तालुक्‍यातील तलाठ्यांमार्फत सोशल ऑडिट केले असता, ४१८ लाभार्थी मृत पावलेले असून त्यांची पेन्शन सुरूच असल्याचे आढळून आले आहे.

हेही वाचा - आता गावातील राजकारण तापणार ; ग्रामपंचायत निवडणुकांच बिगुल लवकरच वाजणार ? -

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय वृद्‌धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना आदी योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या पोस्ट कार्यालयातील बचत खात्यात तहसील कार्यालयातून दरमहा मदतीची (पेन्शनची) रक्‍कम जमा करण्यात येते. मात्र, या योजनेचा लाभ घेणाऱ्यांपैकी काही लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यावर त्याची माहिती तहसील कार्यालयाला न दिल्याने ती माहिती देईपर्यंत या लाभार्थ्यांच्या बचत खात्यात पेन्शनची रक्‍कम जमा केली जाते.

याचा फायदा उचलत आंजर्ले पोस्ट कार्यालयात मृत पावलेल्या काही लाभार्थ्याच्या बनावट सह्या करून शासकीय रकमेचा अपहार झाला असल्याची तक्रार काही जागरूक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने दापोलीच्या तहसीलदारांना लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. दरवर्षी हे लाभार्थी हयात असल्याचा दाखला त्या, त्या गावच्या तलाठ्यांकडून घेतला जातो. मात्र, दोन वर्षे असे सोशल ऑडिट केले नव्हते. 

ऑडिटमधून झाले उघड

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीच दापोली तालुक्‍यातील तलाठ्यांमार्फत या लाभार्थ्यांचे सोशल ऑडिट करण्यात आले. दापोली तालुक्‍यात ५ हजार ३५८ लाभार्थ्यांमधील ४१८ लाभार्थी मृत पावल्याचे सोशल ऑडीटमध्ये उघड झाले आहे. या ४१८ लाभार्थ्यांचे मृत्यूचे दाखले ग्रामपंचायतीकडून घेतले आहेत.

एक नजर

  • मृतांच्या बनावट सह्यांद्वारे अपहार
  • आंजर्ले पोस्टात गैरव्यवहार
  • २२ लाभार्थी मृत झाल्याचा उठवला फायदा
  • पोस्टाकडे मागितले ३ लाख परत

हेही वाचा -  हातरूमालाची मागणी करत, तोतया पोलिसाने निवृत्त शिक्षकाला घातला गंडा

 

आंजर्ले येथील २२ लाभार्थी

या मृत लाभार्थ्यांमध्ये आंजर्ले येथील २२ लाभार्थी असल्याचे दिसून आले असून त्यांच्या बचत खात्यात जमा असलेली सुमारे २ लाख ९४ हजार इतकी रक्‍कम परत करावी, अशी मागणी पोस्ट खात्याकडे केली असल्याची माहिती तहसील कार्यालयातून दिली.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 418 pensioners for received a pension in ratnagiri dabhol but this people are no more in ratanagiri