कोकणात दीड महिन्यानंतर 42 हजार विद्यार्थी शाळेत हजर 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

शिक्षण विभाग; जिल्हा परिषदेच्या एक हजार शाळा सुरू

शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्याचे प्रमाण सर्वात चांगले आहे 

रत्नागिरी:  जिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरीही शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती पन्नास टक्‍क्‍यांपर्यंतच आहे. 9 वी ते 12 वीपर्यंतचे वर्ग सुुरू करण्यास मान्यता मिळाल्यानंतर जिल्ह्यातील 454 पैकी 408 शाळा सुरू झाल्या. 82 हजार 69 पैकी 42 हजार विद्यार्थी शाळेत उपस्थित राहातात. जिल्हा परिषदेच्या सुमारे एक हजाराहून अधिक शाळांचे वर्ग प्रत्यक्षात सुरू झाले आहेत. 

जिल्ह्यात कोरोनाबाधित सापडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दहा ते वीसच्या मध्ये आहे. आठ दिवसांपूर्वी ते एकपर्यंत आले होते. शासन आदेशानुसार जिल्ह्यातील शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू झाल्या. कोरोनाच्या भीतीमुळे पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नव्हते. पालकांचे ना हरकत पत्र ही बाब अडचणीची होती; मात्र शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्याचे प्रमाण सर्वात चांगले आहे. शिवाय उपस्थितीही लक्षणीय आहे. शहरातील पालक अद्याप मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. दीड महिन्यात शाळा सुरू होण्याचे प्रमाण वाढले तरी विद्यार्थी उपस्थिती अजूनही घटलेलीच आहे. शहरी भागातील 46 शाळांमध्ये अद्याप ऑनलाइनच अध्यापन सुरू आहे. 

प्राथमिक शाळेत सामाजिक अंतर राखण्याचा प्रश्‍न 
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळाही सुरू झाल्या आहेत. प्राथमिक विभागाकडून त्यांना परवानगी मिळालेली नाही. तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक आपापल्या जबाबदारीवर या शाळा सुरू करत आहेत; परंतु काही ठिकाणी पट अधिक असल्यामुळे सामाजिक अंतर राखण्याचा प्रश्‍न निर्माण होतो. तेथील मुख्याध्यापक ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. यावरून शिक्षण विभागाकडे तक्रारी येत आहेत. त्याची शहानिशा केली जात आहे. 

हेही वाचा- मी, माझी पत्नी आणि वडील या अपघातामुळे धास्तावलो आहोत

8 शिक्षक व 2 कर्मचारी बाधित 
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली असता, 8 शिक्षक व 2 कर्मचारी कोरोनाबाधित सापडले होते. शिक्षक सापडले तरीही विद्यार्थी संक्रमणाचे प्रमाण शून्यच आहे. त्यामुळे पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. 

कोरोनामुळे शासनाच्या नियमावलींचे पालन करत 9 वी ते 12 वीचे अध्यापन सुरू आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे तापमान व ऑक्‍सिजन मात्रा तपासली जाते. सामाजिक अंतर ठेवण्यासंदर्भातही काळजी घेतली जात आहे. शाळा तसेच पालकांकडून घेण्यात येत असलेल्या काळजीमुळेच जिल्ह्यात एकही विद्यार्थी कोरोना संक्रमित झाला नाही. 
- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी 
 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 42 thousand students attended school in ratnagiri