
रत्नागिरी : पहलगाममध्ये येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातून काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलेल्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने पावले उचलली. त्यांची माहिती संकलित करून संवाद साधला. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ४२ पर्यटक जम्मू-काश्मीर, श्रीनगरमध्ये फिरण्यासाठी गेलेले आहेत. ते सर्व सुरक्षित असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
पालकमंत्री उदय सामंत यांनीही त्या पर्यटकांशी संपर्क साधून सुरक्षिततेची खात्री केली.
काश्मीर येथे मंगळवार (ता. २२) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने काश्मीरमध्ये असलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलली. पहलगामसह काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या ४२ पर्यटकांशी संपर्क साधला आहे. सर्व पर्यटक सुखरूप व सुरक्षित असल्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले. रत्नागिरीतील सर्व सुरक्षित असल्याने सर्वांना निःश्वास सोडला आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले कुणाल देसाई २० जणांसह श्रीनगरमध्ये गेलेले आहेत. या गटात कुणाल देसाई यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या क्लिनिकमधील कर्मचारी सहभागी आहेत. हा गट काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेला होता. त्यामध्ये रत्नागिरीमधील साक्षी संदीप पावसकर (वय २६) आणि रुचा प्रमोद खेडेकर (२१) या सिंधुदुर्गातील ६ नातेवाइकांसोबत २० एप्रिलला काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते. ते मुंबईत २३ रोजी रात्री पोहोचतील.
शिरगाव (रत्नागिरी) येथील खलिफ मुकादम व कुटुंब एकूण ६ सदस्य हे २० एप्रिल अमृता ट्रॅव्हल्समार्फत काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. सर्व पर्यटक श्रीनगर येथे हॉटेलमध्ये सुखरूप असून, २५ ला विमानाने परतीचा प्रवास करणार आहेत. रत्नागिरी येथील मनोज जठार, अनुश्री जठार व इतर ३२ असे एकूण ३४ सदस्य २१ ला श्री टुरिझममार्फत काश्मीरला गेले होते. ते सर्व पर्यटक कटार, जम्मू येथे सुखरूप आहेत. उद्या (ता. २४) रेल्वेने ते दिल्लीत येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षामधून सर्व पर्यटकांना संपर्क झाला असून, ते सर्वजण सुखरूप आणि सुरक्षित आहेत.
पर्यटकांसाठी प्रशासनाचे आवाहन
श्रीनगर जिल्हा प्रशासनाने पर्यटकांच्या मदतीसाठी २४/७ हेल्पडेस्क स्थापन केला आहे. त्यांना संपर्कासाठी ०१९४-२४८३६५१, ०१९४-२४५७५४३, व्हॉट्सअॅपसाठी ७७८०८०५१४४, ७७८०९३८३९७ हे मोबाईल नंबर दिलेले आहेत. रत्नागिरी जिल्हा प्रशासनानेही नागरिकांना आपल्या ओळखीच्या व्यक्तींची माहिती कळवण्याचे आवाहन केले आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला अद्दल घडवली गेलीच पाहिजे. अशा पद्धतीचा हल्ला भविष्यात होणार नाही, याची दहशत आणि अद्दल पाकिस्तानच्या बाबतीत घडली पाहिजे. अशावेळी सर्व देशाने एकत्र आले पाहिजे. हा पूर्ण देशावरचा हल्ला आहे. आपण स्वतःला देशभक्त समजत असून, तर सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामागे उभे राहिले पाहिजे. पूर्ण महाराष्ट्र सरकार या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
- उदय सामंत, उद्योगमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.