नवी मुंबईतून सव्वाचारशे टन आंबा निर्यात

राजेश कळंबटे
Monday, 13 May 2019

एक नजर

  • हापूससह कर्नाटक, केसरसारख्या विविध प्रकारच्या आंब्यांना परदेशात मोठी मागणी.
  • नवी मुंबईतून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, न्युझिलंडला आतापर्यंत सुमारे सव्वाचारशे टन आंबा निर्यात.
  • त्यात सर्वाधिक मान हापूसचा असून आवक कमी असल्याने डझनाला तीस ते चाळीस रुपये अधिक दर. 
  • यावर्षी कोकणच्या हापूससह कर्नाटकी आंब्याच्या उत्पादनावर वातावरणाचा मोठा परिणाम झाल्याने मार्च, एप्रिलमध्ये नवी मुंबईत दाखल होणार्‍या पेट्यांची आवक निम्म्यावर.

रत्नागिरी -  हापूससह कर्नाटक, केसरसारख्या विविध प्रकारच्या आंब्यांना परदेशात मोठी मागणी आहे. नवी मुंबईतून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, न्युझिलंडला आतापर्यंत सुमारे सव्वाचारशे टन आंबा निर्यात झाला आहे. त्यात सर्वाधिक मान हापूसचा असून आवक कमी असल्याने डझनाला तीस ते चाळीस रुपये अधिक दर मिळाला आहे. 

आंबा हंगाम मार्चपासून सुरु होतो. एप्रिल आणि मेमध्ये सर्वाधिक आवक होते; मात्र यावर्षी कोकणच्या हापूससह कर्नाटकी आंब्याच्या उत्पादनावर वातावरणाचा मोठा परिणाम झाला आहे. मार्च, एप्रिलमध्ये नवी मुंबईत दाखल होणार्‍या पेट्यांची आवक निम्म्यावर होती.

एप्रिलच्या अखेरीस ही परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली असून महाराष्ट्र, कर्नाटकच्या मिळून लाखावर पेट्या नवी मुंबईत गेल्या. रत्नागिरी, देवगड हापूसला स्थानिक मार्केटमध्ये चांगला दर मिळत होता. उत्पादन कमी झाले तरीही निर्यातीला वेळेत सुरवात झाली.

सर्वाधिक आंब्यांची निर्यात अमेरिका आणि युरोपीअन देशात होते. आतापर्यंत अमेरिकेमध्ये 165 टन तर ऑस्ट्रेलियात 18 टन आंबा गेला आहे. त्यात पन्नास टक्के हापूस असून उर्वरित चाळीस टक्क्यात अन्य प्रकारचे आंबे आहेत. या दोन्ही देशांत निर्यात करताना विकिरण प्रक्रिया अत्यावश्यक आहे. नवी मुंबईत ही व्यवस्था करुन देण्यात आली आहे. रशिया व न्युझीलंडमध्ये 50 टन आणि युरोपात 200 टन आंबा निर्यात झाला. तिकडे उष्णजल (हॉट ट्रीटमेंट) आणि बाष्पजल (व्हेपरी ट्रीटमेंट) प्रक्रियेचा उपयोग केला जातो.

जेट संपाने वाहतुक दर वाढले

जेट कंपनीच्या संपामुळे विमान वाहतूकीचे दर वधारले असून त्याचा फटका आंबा निर्यातदारांना बसला आहे. निर्यातीकरिता किलोला 160 ते 180 रुपये दर आकारला जात होता. संपामुळे तो 210 ते 215 रुपये आकरण्यास सुरवात झाली आहे. चाळीस ते पन्नास रुपयांनी वाढ झाली आहे. 

दोन दिवसात जपानवारी

जपान, कोरियाला येत्या काही दिवसात हिरवा कंदिल मिळण्याची शक्यता आहे. जपानचे निरीक्षक दोन दिवसात नवी मुंबईत येणार असून निर्यात केंद्रात पाहणी केल्यानंतर तिकडील निर्यात सुरु होणार आहे. जपानमध्ये उष्णजल प्रक्रिया करुनच आंबा पाठविण्यात येतो. त्यानंतर कोरियासाठीचे प्रयत्न सुरु असल्याचे पणन मंडळाकडून सांगण्यात आले.

आंब्याची निर्यात करताना विविध देशांमध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात. ती व्यवस्था नवी मुंबईतील प्रक्रिया केंद्रांमधून उपलब्ध आहे. जास्तीत जास्त निर्यातीतून बागायतदारांना फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न सुरु आहे.

- भास्कर पाटील, सरव्यवस्थापक, पणन मंडळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 425 tonns Mango export from Navi Mumbai