esakal | कौतुकास्पद! 47 गर्भवतींची कोरोनावर मात

बोलून बातमी शोधा

कौतुकास्पद! 47 गर्भवतींची कोरोनावर मात
कौतुकास्पद! 47 गर्भवतींची कोरोनावर मात
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधुदुर्ग): कोरोना जिल्ह्यात दाखल झाल्यापासून गेल्या तेरा महिन्यात तब्बल 47 गर्भवती मातांना कोरोनाची बाधा झाली होती; मात्र सुदैवाने यातून सर्वच्या सर्व गर्भवतींनी कोरोनावर मात केली आहे. माता व बाळ सुखरुप आहेत. सर्वांत जास्त कुडाळ तालुक्‍यात 11 तर सर्वांत कमी देवगड तालुक्‍यात 2 गर्भवतींचा यात समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मार्च 2020 मध्ये कोरोनाचा प्रवेश झाला. तीन ते चार महिन्यात कोरोनाचे जाळे पसरत गेले. 2020च्या सप्टेंबरमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले. त्यानंतर कोरोनाचे रौद्ररूप हळू-हळू कमी झाले. परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात होत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने त्सुनामी आणली. सध्याचा आढावा घेतला असता जिल्ह्यात रोज 200 ते 300 रुग्ण आढळत आहेत. गर्भवती मातांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधित पहिली गर्भवती माता मेमध्ये देवगड तालुक्‍यात आढळली. त्यानंतर जूनमध्ये कणकवली, सावंतवाडी व दोडामार्ग येथे प्रत्येकी एक, जुलैत कणकवली, कुडाळ व सावंतवाडी तालुक्‍यात प्रत्येकी एक, ऑगस्टमध्ये वैभववाडी तालुक्‍यात एक, कुडाळमध्ये 2, वेंगुर्ले 3, सावंतवाडी 1 व दोडामार्गमध्ये 2, सप्टेंबरमध्ये वैभववाडी 3, कणकवली, दोडामार्ग व देवगडमध्ये प्रत्येकी 1, मालवण 4, कुडाळ 6, सावंतवाडी 3, ऑक्‍टोबरमध्ये कुडाळ व सावंतवाडीमध्ये प्रत्येकी एक, नोव्हेंबरमध्ये वेंगुर्लेमध्ये एक, डिसेंबरात कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग तालुक्‍यात प्रत्येकी 1, जानेवारी व फेब्रुवारीत एकही रुग्ण आढळला नव्हता. मार्चमध्ये वैभववाडी व देवगडमध्ये प्रत्येकी 1, एप्रिलमध्ये वैभववाडी 1 व वेंगुर्लेत 2 रूग्ण आढळले होते.

असे आहे प्रमाण

जिल्ह्यात गेल्या 13 महिन्यात 47 गर्भवतींना कोरोना झाल्याची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी आहे. कणकवली तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट असला तरी या तालुक्‍यात सुदैवाने कोरोनाच्या 3 गरोदर माता आढळल्या आहेत तर सर्वाधिक रुग्ण कुडाळ तालुक्‍यात 11 मिळाले आहेत. वैभववाडीमध्ये 6, देवगडमध्ये 2, मालवणमध्ये 5, वेंगुर्लेमध्ये 7, सावंतवाडीमध्ये 8 व दोडामार्गमध्ये 5 रुग्ण मिळाले आहेत.

पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर आहे. पहिल्या लाटेत काही गर्भवती होम आयसोलेशन तर काही रुग्णालयात उपचार घेऊन बऱ्या झाल्या आहेत. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आता दुसऱ्या लाटेत गर्भवतींनी हयगय करू नये. कोरोना झाल्यास तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे. शासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे.

- डॉ. नित्यानंद मसुरकर, प्रसूती तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग

Edited By- Archana Banage