Weather Update: 48 तासांत पाऊस ओसरणार ; आठवड्याभरात थंडी वाढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weather update

Weather Update: 48 तासांत पाऊस ओसरणार ; आठवड्याभरात थंडी वाढणार

कणकवली : तमिळनाडूमध्ये (Tamilnadu) उष्णतेची लाट आल्याने गोव्यासह(Goa)कोकणातील दोन जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळत आहे; मात्र येत्या ४८ तासांत परिस्थिती पूर्वपदावर येईल, असे असले तरी थंडी सुरू होण्यासाठी अजून आठवडा लागेल, असा अंदाज पुणे येथील हवामान खात्याचे प्रमुख अनुपम कश्यपी (Anup Kashyap) यांनी व्यक्त केला.

तमिळनाडूमध्ये सध्या तापमानामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. याचा परिणाम दक्षिण भारतासह गोवा आणि कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला सोसावा लागत आहे. दक्षिणेकडील उष्ण वारे वाढल्यामुळे कोकण किनारपट्टीवर आर्द्रता वाढलेली आहे. येत्या ४८ तासांत तमिळनाडू आणि हिंदी महासागरातील उष्णतेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्यानंतर वातावरणामधील बदलाचे संकेत आहेत.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच गोव्यामध्ये सध्या पावसाचे सावट आहे. किरकोळ ठिकाणी सातत्याने पाऊस कोसळत आहे. आर्द्रता वाढत असल्याने ही परिस्थिती निर्माण झालेली आहे; मात्र येत्या ४८ तासांत हवामानामध्ये बदल होणार आहे. दक्षिण भागातील उष्णतेची लाट कमी झाल्यानंतर गोवा आणि कोकण किनारपट्टीवरील वातावरणात बदल होऊन पुन्हा एकदा हळूहळू थंडी जाणवायला लागेल; मात्र थंडीचा कडाका वाढायला आठवडा लागण्याची शक्यता आहे. पुढच्या दोन दिवसांनंतर कोकणातील काही भागांमध्ये किरकोळ ठिकाणी पाऊस होऊ शकतो. दोन दिवस ढगाळ वातावरण कायम राहील, असेही कश्यपी यांनी नमूद केले.

कोकण किनारपट्टीला गेल्या चार दिवसांपासून हवामान बदलाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप आजही सुरू आहे. त्यामुळे शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी भात कापणीची कामे अर्धवट स्थितीत आहेत. भात कापल्यानंतर गुरांचा चारा म्हणून शिल्लक ठेवलेले गवतही या अवकाळी पावसामध्ये भिजत आहे.

हेही वाचा: आम्ही गरजणारे नव्हे बरसणारेच: विधान परिषदेत महाडिकच विजयी होणार

फळधारणाही धोक्यात

हवामानाच्या बदलामुळे आगामी काळातील हापूस, आंबा आणि काजू उत्पादनावरही मोठा परिणाम होणार आहे. फळ पिकांना फुटवा येण्यासाठी आणि आवश्यक अशी फळधारणा होण्यासाठीची नैसर्गिक प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा कोकणी मेव्यासह आर्थिक कणा असलेला आंबा आणि काजू उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

loading image
go to top