esakal | सिंधुदुर्गात तुर्तास 5 हजार लस; नोंदणी झालेल्यांना प्राधान्य

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गात तुर्तास 5 हजार लस; नोंदणी झालेल्यांना प्राधान्य
सिंधुदुर्गात तुर्तास 5 हजार लस; नोंदणी झालेल्यांना प्राधान्य
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गासाठी ५००० एवढ्या लशी उपलब्ध झाल्या आहेत; मात्र ज्यांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे त्या १८ ते ४० वयोगटातील व्यक्तींना आजपासून (४) प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी रोज १०० जणांना लस दिली जाणार आहे. मात्र ज्यांची नोंदणी नाही आणि पहिल्या शंभरमध्ये आपले नाव नाही, अशा व्यक्तींनी लसीकरण केंद्रांमध्ये गर्दी करू नये. मुबलक लस उपलब्ध झाल्यानंतर सर्वांना टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

सामंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, "जिल्हासाठी आवश्‍यकतेपेक्षा कमी लस प्राप्त झाल्याने दर दिवशी तालुक्‍याच्या ठिकाणी १०० लोकांना लसीकरण करण्यात येणार आहे. लशीचा मुबलक साठा येईल तेव्हा आरोग्य उपकेंद्र स्तरावर लसीकरण करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत तालुकास्तरावर लसीकरण सुरू असून जनतेने प्रशासनास सहकार्य करावे.''

हेही वाचा: रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचा 'तो' मेसेज फेकच!

ते म्हणाले, "जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बाधित रुग्णांना होम क्वारंटाईन करताना त्यांच्या हातावर शिक्का मारण्यासाठी निवडणुकांसाठी वापरण्यात येणारी शाई उपलब्ध होत नाही. त्यामुळे आता शिक्‍याऐवजी हाताच्या बोटाला शाई लावण्यात येणार आहे. ५ मेपासून पुन्हा 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम राबविण्यात येणार आहे. ज्या रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आले आहे असे रुग्ण सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याची तक्रार आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.''

पत्रकारांसाठी स्वतंत्र कॅम्प

जिल्ह्यातील १८ ते ४४ आणि ४५ वर्षांवरील कार्यरत पत्रकारांची यादी आपल्याकडे सादर करावी. त्यांच्यासाठी आवश्‍यक लसीकरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून स्वतंत्र कॅम्प आयोजित करण्यात येईल, असे यावेळी सामंत यांनी स्पष्ट केले.