सिंधुदुर्गात शिक्षकांची 500 पदे रिक्त 

नंदकुमार आयरे
Tuesday, 27 October 2020

रिक्त पदे न भरल्यास तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा सदस्य विष्णूदास कुबल यांनी सभेत दिला. जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा सभापती सावी लोके यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज समिती सभागृहात आज झाली.

सिंधुदुर्गनगरी-  जिल्ह्यात केंद्रप्रमुख, पदवीधर आणि उपशिक्षक, अशी 500 हून अधिक पदे रिक्त आहेत. याचा अध्यापनावर मोठा परिणाम होत आहे. रिक्त पदांमुळे शाळा कशा चालवायच्या आणि दर्जेदार शिक्षण कसे द्यायचे? असा प्रश्‍न आहे. तरी शासनाने सर्व रिक्त पदे तत्काळ भरावीत, असा ठराव आजच्या शिक्षण समिती सभेत घेण्यात आला. रिक्त पदे न भरल्यास तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा सदस्य विष्णूदास कुबल यांनी सभेत दिला. जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा सभापती सावी लोके यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज समिती सभागृहात आज झाली.

यावेळी समिती सचिव तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, विष्णुदास कुबल, सरोज परब, संपदा देसाई, राजन मुळीक आदीसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते. आजच्या शिक्षण समितीमध्ये रिक्त पदांचा आढावा घेतला असता केंद्रप्रमुख 48 पदे, पदवीधर शिक्षक 272 पदे तर उपशिक्षकांची 288 पदे रिक्त असल्याची माहिती सभेत देण्यात आली. ही रिक्त पदे भरण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त नसल्याची माहिती सभेत देण्यात आली. यावर चर्चा झाली. होऊन जिल्ह्यात केंद्रप्रमुख पदवीधर व शिक्षकांची महत्त्वाची पाचशेहून अधिक पदे रिक्त असताना येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळणार? शासनाने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टीने तत्काळ ही पदे भरावीत, असा ठराव शिक्षण समिती सभेत घेण्यात आला. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळा दुरुस्तीचा प्रश्‍न गंभीर असून 2017-18 मध्ये मंजूर कामे अद्यापही अपूर्ण आहेत. जिल्ह्यातील शाळा दुरूस्तीच्या 230 मंजूर कामांपैकी 17 कामे पूर्ण झाली असून 41 कामांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. अन्य कामे निविदा प्रक्रियेत आहेत, अशी माहिती सभेत देण्यात आली. यावर चर्चा करताना शाळा दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण न झाल्यास विद्यार्थ्यांना बसविणार कुठे? ही कामे वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीकडे शाळा दुरुस्तीची जबाबदारी सोपवावी, असा ठराव सभेत झाला. 

शिक्षकांच्या निवृत्तीची प्रकरणे, वैद्यकीय बिलांची प्रकरणे, वेळेत मंजूर होत नसल्याबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत. तरी ही प्रकरणे तत्काळ सोडवावीत. तालुकास्तरावरच संबंधितांचे प्रस्ताव परिपूर्ण स्वीकारावे. जिल्हास्तरावर परिपूर्ण प्रस्ताव पाठवावेत. येथे आलेला एकही प्रस्ताव फेटाळला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. अशा सूचना सभापती सावी लोके यांनी दिल्या. 

शिक्षणाधिकारी का अनुपस्थित? 
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या संदर्भात दोन-तीन बैठकांना विविध प्रश्‍न उपस्थित होत असताना माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस सभांना उपस्थित राहत नाहीत. याबद्दल आजच्या सभेत सदस्य दादा कुबल आणि संपदा देसाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सदस्यांचे प्रश्‍न टाळण्यासाठी ते सभाना गैरहजर राहत असल्याचा आरोप केला. यावर प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी ते मेडिकल रजेवर असल्याचे सांगितले. तरी यापुढे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची मोकळी वेळ घेऊनच आणि फिटनेस दाखला घेउनच सभेचे आयोजन करा, अशी सूचना सदस्य संपदा देसाई यांनी सभेत मांडली.  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 500 vacancies for teachers in Sindhudurg