Ratnagiri : जिल्ह्यात आणखी ५८ जण निलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus
जिल्ह्यात आणखी ५८ जण निलंबित

जिल्ह्यात आणखी ५८ जण निलंबित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : एसटी कामगारांचे सलग दहाव्या दिवशीही कामबंद आंदोलन सुरू आहे. शासनाच्या दबावतंत्रामुळे जिल्ह्यात आज ५८ कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस पाठवण्यात आली. त्यामुळे एकूण निलंबितांची संख्या ८५ झाली. आज आणखी ४४ कर्मचारी कामावर हजर झाल्याने जिल्ह्यात १४३ कामगार हजर आहेत. कंत्राटी कामगारांवर कारवाईचा बडगा उगारल्याने उद्या (ता. १८)पासून ते हजर होऊ शकतात.

शासनाकडून दबाव तंत्राचा वापर सुरू असला, तरीही जिल्ह्यातील कर्मचारी अजूनही ‘बंद’वर ठाम आहेत. आतापर्यंत साडेचार हजार कर्मचाऱ्यांपैकी १४३ जण सेवेत रुजू झाले. ‘बंद’मध्ये सहभागी झालेल्या ८५ कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत निलंबन करण्यात आले आहे.

यात सुरुवातीला रत्नागिरी आगारातील १८ व राजापूरमधील नऊ कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. कार्यालयीन कामात व्यत्यय आणणे तसेच या कामगारांमुळे अन्य कामगार कामावर न येणे अशी कारणे सांगत आज जिल्ह्यात कामगारांना निलंबनाची नोटीस देण्यात आली. यात मंडणगड आगारातील सात, दापोली १८, खेड सहा, लांजा १२, गुहागर चार, देवरुख पाच, चिपळूण सहा अशा एकूण ५८ जणांचा समावेश आहे. आज रत्नागिरी व राजापूरमधील कोणालाही निलंबित केलेले नाही.

शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर अद्याप तोडगा निघालेला नाही. कर्मचारीही राज्य शासनात विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम असून, ठोस निर्णय झाल्याशिवाय मागे हटणार नाहीत, अशा पवित्र्यात आहेत. त्यामुळे शासनाकडून या कर्मचाऱ्यांना ‘बंद’मधून माघार घेण्यासाठी काही तासांचा अल्टीमेटम देऊन प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

तीव्र नाराजीचे सूर

निलंबनाच्या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे सूर उमटत आहेत. कामावर हजर होण्याच्या एसटी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरी विभागातील १४३ कर्मचारी कामावर हजर झाले; परंतु वाहतूक सुरू करण्यास एवढे कर्मचारी पुरेसे नाहीत. त्यामुळे एसटी प्रशासनही हतबल झाले आहे. एसटी वाहतूक बंदमुळे आतापर्यंत साडेचार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. हा आकडा दरदिवशी वाढतच जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

loading image
go to top