सोनवडे-घोटगे घाटासाठी 590 कोटी 

तुषार सावंत
Saturday, 17 October 2020

याखेरीज पर्यावरण आणि वन्यजीव विभागाचेही सर्व दाखले उपलब्ध झाल्याचीही माहिती श्री. चव्हाण यांच्याकडून देण्यात आली. 

कणकवली (सिंधुदुर्ग) - गेली 40 वर्षे रखडलेल्या सोनवडे-घोटगे घाटमार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. आता आशियाई विकास बॅंकेच्या माध्यमातून सोनवडे-घोटगे घाटमार्गासाठी 590 कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. त्याबाबतचा निर्णय आज मुंबईत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी याखेरीज पर्यावरण आणि वन्यजीव विभागाचेही सर्व दाखले उपलब्ध झाल्याचीही माहिती श्री. चव्हाण यांच्याकडून देण्यात आली. 

सोनवडे-घोटगे घाटमार्गाच्या अनुषंगाने आज सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात आमदार प्रकाश आबिटकर, तसेच बांधकामचे अधीक्षक अभियंता श्री. माने, खासदार विनायक राऊत, खासदार संजय मंडलिक, आमदार वैभव नाईक हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते. 

सोनवडे-घोटगे घाटमार्गाचे काम गेली 40 वर्षे विविध कारणास्तव रेंगाळले आहे. त्याबाबतचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. घाटमार्गात केंद्राचा वन्यजीव विभाग आणि पर्यावरण विभाग या दोन्हींचे विभागांचे ना हरकत दाखले मिळाल्याची माहिती श्री. चव्हाण यांनी दिली. खासदार विनायक राऊत यांनी निधीअभावी घाटमार्गाचे काम थांबल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. 

या घाटमार्गासाठी यापूर्वी बजेटमधून 115 कोटींची तरतूद करण्यात आली होती; मात्र आता घाटमार्गाचे अंदाजपत्रक 590 कोटींपर्यंत पोचले आहे. त्यामुळे या घाटमार्गासाठी आशियाई विकास बॅंकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. चव्हाण यांनी दिली. घाटमार्गात येणारी झाडे तोडण्यासाठी 4.20 कोटींची रक्कम लवकरच वनविभागाकडे वर्ग केली जाणार असल्याचेही ते म्हणाले. 

""सोनवडे-घोटगे घाटमार्गासाठी आवश्‍यक ते पर्यावरण, वन्यजीव विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र उपलब्ध झाले. तर सहाशे कोटी रुपयांपर्यंतच्या खर्चासाठीची तरतूद आशियाई बॅंकेच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे लवकरच घाटमार्गाचे काम सुरू होईल आणि सह्याद्रीपट्ट्यातील अनेक गावे विकासाच्या नकाशावर येतील.'' 
- वैभव नाईक, आमदार 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 590 crore for Sonawade-Ghotge Ghat