कोकणात औषधांच्या नावाखाली लूट ; रेमडिसिव्हीरसाठी मोजावे लागतात सत्तर हजार रुपये

मुझफ्फर खान
Wednesday, 23 September 2020

औषधालयांकडून कोरोनाबाधित रूग्णांच्या नातेवाईकांची लुट सुरूच असताना सरकारी यंत्रणा मात्र शांत आहे.

चिपळूण : कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचारादरम्यान वापरण्यात येणार्‍या रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा चिपळूणात काळाबाजार सुरू आहे. रूग्णांच्या नातेवाईकांना  ५४०० रुपयाच्या एका इंजेक्शनसाठी कुठे चाळीस हजार तर कुठे तब्बल सत्तर हजार रुपये मोजावे लागत आहेत. कोरोनाबाधीत रूग्णांकडून होणार्‍या लुटीच्या विषयावर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आवाज उठविण्यास सुरवात केली आहे. तरी खासगी रूग्णालये आणि औषधालयांकडून कोरोनाबाधित रूग्णांच्या नातेवाईकांची लुट सुरूच असताना सरकारी यंत्रणा मात्र शांत आहे. 

हेही वाचा - नाॅन स्टॅाप चोविस तास : जिद्दी अभियंत्यांनी एक महिन्यात पेडणे बोगद्यात दाखवला अविष्कार 

तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथील सरकारी रूग्णालयात खाटांची संख्या कमी असल्यामुळे खासगी रूग्णालयात कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. बाधीत रूग्णांवर उपचार करताना त्यांच्याकडून किती पैसे घ्यावेत याचे दरपत्रक सरकारने जाहीर केले असले तरी औषधे आणि इतर छुप्या मार्गाने रूग्णांची लूट सुरू आहे. कोरोनाबाधीत रूग्णांना गरज असेल तरच  रेमडिसिव्हीर इंजेक्शन दिले जाते. सरकारी रूग्णालयात हे इंजेक्शन सरकारकडून पुरविले जाते. त्याचा खर्च रूग्णांकडून घेतला जातो. खासगी रूग्णालयात जवळपास सर्वच रूग्णांना हे इंजेक्शन आणण्याची सक्ती केली जात आहे. 

डॉक्टर रूग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन आणण्यासाठी चिठ्ठी लिहून देतात. त्यानंतर रूग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शन मिळवण्यासाठी पळापळ सुरू होते. स्थानिक औषधालयात चौकशी केल्यानंतर इंजेक्शन दोन दिवसाने किंवा 48 तासानंतर मिळेल पण त्यासाठी 30 ते 70 हजार रुपयाची मागणी केली जाते. रूग्णांचा आधारकार्ड, मोबाईल नंबर, कोवीड पॉझिटीव्ह असल्याचा रिपोर्ट आणि डॉक्टरांची चिट्ठी या गोष्टी आवश्यक केल्या जातात. याच किमतीमध्ये खासगी रूग्णालये  रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा करत आहेत. काही रूग्णांना एका तर काहींना दोन इंजेक्शन दिले जाते. रूग्ण बरा झाला पाहिजे म्हणून नातेवाईक विरोध न करता इंजेक्शनसाठी येणारा हा खर्च करत आहेत. 

"इतर औषधांनी कोरोनाबाधीत रूग्ण बरा होणार असेल तर रेमडिसिव्हीर इंजेक्शनची गरज लागत नाही. कामथे जिल्हा उपरूग्णालयात दाखल होणार्‍या रूग्णांपैकी आवश्यक असेल अशाच रूग्णांना आम्ही रेमडिसिव्हीर ही इंजेक्शन देतो. आम्हाला ही इंजेक्शन सरकारकडून पुरविले जाते. खासगी रूग्णालयात रूग्णांची लूट सुरू असेल तर रूग्णांच्या नातेवाईकांनी अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलिसांकडे कारवाई करावी." 

- डॉ. अजय सानप वैद्यकीय अधिकारी कामथे उपजिल्हा रूग्णालय

 

हेही वाचा - चिंता कर्जाचे हप्ते भरण्याची  : आशा पर्यटनाला दिवाळी बूस्टरची

"कोरोनाबाधीत रूग्णांचे नातेवाईक तणावाखाली असल्यामुळे ते तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. परंतू खासगी डॉक्टरांच्या लुटीबाबत सर्वच स्तरावरून आवाज उठविले जात असल्यामुळे पोलिस किंवा अन्न व औषध प्रशासन विभागाने बोगस रूग्ण पाठवून सापळा रचावा असेही होत नाही. त्यामुळे सरकारी यंत्रणेच्या भूमिकेबाबत शंका निर्माण होते." 

- शौकत मुकादम, सामाजिक कार्यकर्ते 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 70000 rupees received by corona patients relatives for remdesivir medicine in ratnagiri hospitals