esakal | दापोलीत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 71 टक्‍के

बोलून बातमी शोधा

दापोलीत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 71 टक्‍के
दापोलीत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 71 टक्‍के
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दाभोळ : दापोली तालुक्‍यातील बोरिवली, ताडील, लोणवडी आदी भाग कोरोनाचा हॉटस्पॉट ठरण्याची लक्षणे असून दापोली आरोग्य यंत्रणा कोरोनाला रोखण्यासाठी करत असलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहेत. आतापर्यंत तालुक्‍यात 1 हजार 940 बाधित रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी 1 हजार 608 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दापोलीतील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 71 टक्‍के असून दापोलीचा मृत्यूदर 4 टक्‍के इतका आहे.

दापोली तालुक्‍यात 15 एप्रिलपासून राज्याप्रमाणेच कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी संचारबंदीला सुरवात झाली आहे. 1 ते 15 एप्रिलपर्यंत दापोलीत 410 संशयित बाधित रुग्ण आढळून आले होते तर 16 ते 23 एप्रिलच्या दरम्यान तब्बल 451 संशयित बाधित रुग्णांची नोंद केली आहे. दापोली तालुक्‍यात आतापर्यंत 76 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 1 ते 15 एप्रिलदरम्यान 10 तर 16 ते 23 एप्रिल दरम्यान 10 असे एकूण 20 संशयित बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये म्हाळुंगे 3, ओणनवसे 2, शिरखल, ताडील, उन्हवरे, पिसई, आंजर्ले, करंजाणी, टाळसुरे, बोरिवली, पाचवली, गावतळे, लोणवडी, विसापूर, वडवली, कळंबट, केळशी येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे.

आरटीपीसीआरमध्ये 51 रुग्ण बाधित

तालुक्‍यातील बोरिवली हे गाव दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असून गावातील 100 संशयित रुग्णांची आरटीपीसीआर केली असता, त्यातील 51 रुग्ण हे कोरोनाबाधित आढळून आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. येथे आढळून आलेल्या रुग्णांची संख्या मोठी असली तरी त्याची लक्षणे सौम्य असल्याने त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगितले.