हौसेला मोल नाही म्हणत दसऱ्यानिमित्त रत्नागिरीत झाली तब्बल ८ कोटींची वाहनखरेदी

राजेश शेळके
Tuesday, 27 October 2020

आरटीओ कार्यालयाला यातून सुमारे ७० लाख ८६ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे.

रत्नागिरी : दसऱ्याच्या मुहूर्तावर झालेल्या वाहन खरेदीने कोरोनाच्या संकटाची झळ मागे सारल्याचे चित्र उभे केले आहे. गेल्या चार ते सहा दिवसांमध्ये जिल्ह्यात ६१२ वाहने खरेदी करून अनेकांनी आपला दसऱ्याचा आनंद द्विगुणित केला. वाहन खरेदीत सुमारे ८ कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. ही खरेदी गेल्यावर्षीच्या तुलनेत दीडपट आणि अर्थचक्राला गती देणारी आहे. आरटीओ कार्यालयाला यातून सुमारे ७० लाख ८६ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांनो आंबा व काजू फळपिक विमा उतरवला का ? नोव्हेंबरपर्यंतच मुदत -

दसऱ्याच्या मुहूर्तावर काही ना काही खरेदी करून आपल्या आनंदात भर टाकतो. सोने, नवीन वस्तू, गृहप्रवेश यादीबरोबर वाहन खरेदीही मोठ्या प्रमाणात होते. आपल्या हक्काचे वाहन हे प्रत्येकाचे स्वप्न आहे. त्याला फायनान्स कंपन्या, बॅंका आदींची आर्थिक जोड मिळते, मात्र यंदाच्या दसऱ्यावर कोरोनाचे सावट होते. कुटुंबापुरता मर्यादित हा उत्सव झाला. 

गेली सात महिने अनेक बेरोजगार झाले, तर काही आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे यंदाच्या दसऱ्याला खरेदीला मार्यादा येतील, असेच अनेकांचे मत होते. मात्र, दसऱ्याचा मुहूर्त साधून जिल्ह्यात दसऱ्या दरम्यान ६१२ वाहनांची खरेदी झाली. यामध्ये दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनांचा समावेश आहे. वाहन खरेदीची ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. त्यामुळे वाहन नोंदणी, टॅक्‍स, रोड टॅक्‍स आदीच्या माध्यमातून आरटीओ कार्यालयाला दसऱ्यात ७० लाख ८६ हजार २६८ रुपयाचे उत्पन्न मिळाले. गेल्यावर्षी ४४६ वाहनांची खरेदी होऊन ५५ लाखांच्या दरम्यान उत्पन्न मिळाले होते.

हेही वाचा - प्रवाशांनो वेळेत स्थानकात या, अन्यथा तुमची ट्रेन चुकू शकते

 "हौसेला मोल नसते हे खरे आहे. त्यामुळे प्रत्येकजण दसऱ्यात आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी वाहन खरेदीच धाडस करतो. या दसऱ्या दरम्यान जिल्ह्यात चांगली वाहन खरेदी होऊन शासनाला चांगले उत्पन्न मिळाले आहे."

- विनोद चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 8 crore rupees vehicle buying from this year navratri in ratnagiri RTO office received rupees 70 lakh in ratnagiri