esakal | ठेकेदार अडचणीत; 9 कोटी अडकले, कामही थांबले
sakal

बोलून बातमी शोधा

ठेकेदार अडचणीत; 9 कोटी अडकले, कामही थांबले

२०२०-२१च्या कामांना शासनाने अद्याप मंजुरी दिली नसल्याने जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची कामे रखडली आहेत, अशी माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

ठेकेदार अडचणीत; 9 कोटी अडकले, कामही थांबले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी : शासनाच्या २५ -१५ योजनेअंतर्गत २०१९-२० मध्ये पूर्ण करण्यात आलेल्या १८३ कामांच्या सुमारे ९ कोटी निधीचे दायित्व शासनाकडे असल्याने ठेकेदार अडचणीत आले आहेत. २०२०-२१च्या कामांना शासनाने अद्याप मंजुरी दिली नसल्याने जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची कामे रखडली आहेत, अशी माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

शासनाच्या २५-१५ योजनेअंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत आदी बांधकामाची कामे केली जातात. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात २०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षाच्या कालावधीत ५८१ कामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये कुडाळ २५६ कामे, देवगड ८६ कामे, मालवण १५० कामे, कणकवली २१, वैभववाडी १३, सावंतवाडी ४१,व दोडामार्ग तालुक्यातील १४ कामांचा समावेश आहे. जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या ५८१ कामापैकी ४२९ कामांना प्रशासकीय मंजुरी देऊन त्यापैकी ३९९ कमाना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. पैकी आतापर्यंत ३५४ कामे पूर्ण झाली असून ३७ कामे अपूर्ण आहेत. ४९ कामे अद्याप सुरू झालेली नसून ५९ कामे तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आली आहेत.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येण्याची शक्यता; १७ सप्टेंबरला बैठक

चार वर्षांत कार्यारंभ आदेश देण्यात आलेल्या ३९९ कामापैकी ३५४ कामे पूर्ण झाली आहेत; मात्र यापैकी १८३ कामांचे सुमारे ९ कोटी रुपये निधी अद्याप शासनाकडे दायित्व आहे. दायित्व याचा अर्थ काम करायला आवश्यक परवानग्या दिल्या असल्या तरी निधी अद्याप संबंधीत विभागाकडे पोहोचलेला नाही. शासनाकडे ९ कोटी रुपयांचे दायित्व असल्याने पूर्ण झालेल्या १८३ कामांची बिले अद्याप ठेकेदारांना मिळालेली नाहीत. त्यामुळे संबंधित ठेकेदार अडचणीत सापडले आहेत. याचा परिणाम सुरू असलेल्या कामांवर होत आहे.

‘बांधकाम’ म्हणते, कामे पूर्ण करू!

शासनाच्या २५-१५ योजनेअंतर्गत नवीन आर्थिक वर्षांतील २०२०-२१च्या कामांना अद्याप शासनाने मंजुरी दिलेली नाही. अर्धवट असलेल्या कामांना निधी नसल्याने ती कामे पूर्ण करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. शासनाच्या २५-१५ योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचा निधी मिळावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून निधी प्राप्त होताच संबंधित कामाची बिले अदा केली जातील. तर अर्धवट राहिलेली कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा: मोठी बातमी! पाकच्या दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड; देशभरात करणार होते घातपात

ग्रामीण भागातील रस्ते खड्ड्यात

गेली दोन वर्षे रस्ते कामांसाठी, विविध रस्ते विकास योजनांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत. जिल्ह्यात सध्या गणेशोत्सव सुरू असून बाहेरून येणाऱ्या चाकरमान्यांची वाहने तसेच स्थानिक वाहनांची संख्या वाढल्याने जिल्ह्यातील खड्डेमय रस्त्यांमुळे वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. त्यातच जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. रस्ते ठीक-ठिकाणी चिखलाने माखले आहेत यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याबाबत जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.

loading image
go to top