गर्भाशयातला साडेनऊ किलोचा ट्युमर काढला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जून 2019

रत्नागिरी - जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीमने रत्नागिरी तालुक्‍यातील एका महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून पोटातून तब्बल साडेनऊ किलोचा गर्भाशयाचा ट्यूमर बाहेर काढला. सात वर्षे आजाराशी झुंज देणाऱ्या महिलेला ‘सिव्हिल’मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे दिलासा मिळाला. अडीच तास शस्त्रक्रिया करण्यात आली.

रत्नागिरी - जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीमने रत्नागिरी तालुक्‍यातील एका महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून पोटातून तब्बल साडेनऊ किलोचा गर्भाशयाचा ट्यूमर बाहेर काढला. सात वर्षे आजाराशी झुंज देणाऱ्या महिलेला ‘सिव्हिल’मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे दिलासा मिळाला. अडीच तास शस्त्रक्रिया करण्यात आली.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विनोद सांगवीकर यांनी शस्त्रक्रिया केली. तालुक्‍यातील जयगडजवळच्या कचरे येथील शीला दत्ताराम हळदणकर (वय ३५) या पोटाच्या विकाराने त्रस्त होत्या. सुमारे सात वर्षे त्यांच्या पोटातील गाठ वाढत होती. तात्पुरत्या उपचारानंतर आराम मिळत होता. महिनाभरापूर्वी त्यांच्या पोटात गर्भाशयाच्या पिशवीजवळ ट्यूमरची मोठी गाठ असल्याचे निष्पन्न झाले. शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले.

तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. दाखल केल्यानंतर अखेरच्या क्षणी शस्त्रक्रिया येथे होणार नाही. मुंबई, पुण्याकडे जावे लागेल, असे सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच शीला हळदणकरना घेऊन नातेवाईक जिल्हा रुग्णालयात आले होते. डॉ. विनोद सांगवीकर यांनी तपासणी केल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ. बोल्डे स्वतः शस्त्रक्रियेत सहभागी झाले. सकाळी साडेदहाला शस्त्रक्रियेला सुरवात करण्यात आली. अडीच तासांच्या अथक प्रयत्नाने गर्भाशयाच्या पिशवीजवळील साडेनऊ किलोचा ट्यूमर बाहेर काढण्यात आला. ट्यूमर मोठा असल्याने अनेक छोट्या रक्तवाहिन्या त्याला जोडल्या गेल्या होत्या. त्या सर्वप्रथम बाजूला करून ट्यूमर काढण्याचे आव्हानात्मक काम डॉ. सांगवीकर, डॉ. बोल्डे यांनी यशस्वी केले. जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रथमच एवढी मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. पालिकेचे पाणी सभापती सोहेल मुकादम यांनी दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कौतुक केले. 

आतापर्यंत साडेचार-पाच किलोपर्यंतच्या गाठी काढण्याच्या शस्त्रक्रिया येथे केल्या होत्या. ही गाठ मोठी असल्याने शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होती. मात्र, डॉ. सांगवीकर यांनी ही शस्त्रक्रिया चांगल्या प्रकारे हाताळली.
- डॉ. बोल्डे, जिल्हा शल्यचिकित्सक

रुग्ण खासगीतून आला होता. त्यांना मुंबई, पुण्यात जायला सांगितले होते. अडचणी होत्या, त्यासाठी डॉ. बोल्डे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर पूरक यंत्रणाही सज्ज ठेवली होती. त्यामुळे दोन ते तीन तासांत गाठ काढता आली.
- डॉ. सांगवीकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 9.5 kg tumor is removed from the uterus in Ratnagiri