आयनोडे - हिवाळे , कुडाचे सरपंचांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

या निवडणुकीत अश्विनी सुभाष जाधव ह्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्य म्हणून अनुसूचित जाती महिला या आरक्षित पदावर निवडून आलेल्या होत्या.

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - जात वैधता प्रमाणपत्र वेळेत दाखल न केल्याने दोडामार्ग तालुक्‍यातील आयनोडे-हिवाळे सरपंच श्रीमती अश्‍विनी सुभाष जाधव यांचे सरपंचपदासह ग्रामपंचायत सदस्यत्व त्याचप्रमाणे दोडामार्ग तालुक्‍यातील कुडाचे ग्रामपंचायत सदस्य अभिजित राजन शेर्लेकर यांना ग्रामपंचायत सदस्यत्व पदावरून जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी अपात्र केले आहे. 

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 10 -1 अ मधील तरतुदीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा यथास्थिती, नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्याकरिता राखीव असलेल्या जागेसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीने नामनिर्देशन पत्र बरोबर महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास वर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम 2000 ( 2001 चा महा. 20) च्या तरतुदीनुसार अनुसरून सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक असते; मात्र दोडामार्ग तालुक्‍यातील आयनोडे-हिवाळे या ग्रामपंचायतीची पोट निवडणूक जून 2019 मध्ये पार पडली होती.

या निवडणुकीत अश्विनी सुभाष जाधव ह्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्य म्हणून अनुसूचित जाती महिला या आरक्षित पदावर निवडून आलेल्या होत्या. त्याचप्रमाणे दोडामार्ग तालुक्‍यातील कुडासे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी जून 2019 मध्ये पोट निवडणूक घेण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत नागरीकांचा मागास प्रवर्ग या आरक्षित जागेवर अभिजित राजन शेर्लेकर हे निवडून आले होते. 

निवडणुकीच्या वेळी या दोन्ही सदस्यांनी आपले जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नव्हते. हे जात पडताळणी प्रमाणपत्र निवडून आल्यानंतर 12 महिन्याच्या आत सादर करणे बंधन कारक असते; मात्र आयनोडे हेवाळे सरपंच श्रीमती अश्‍विनी जाधव तसेच कुडासे ग्रामपंचायत सदस्य अभिजीत शेर्लेकर या दोघांनीही आपली प्रमाणपत्रे बारा महिने पूर्ण होऊन गेले तरीही सादर न केल्याने जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी या दोघांचीही पदे त्यांना मिळालेल्या भूतलक्षी प्रभावाने निरर्ह करून अश्‍विनी जाधव यांना सरपंच पदासह सदस्य पदावरून आणि अभिजीत शेर्लेकर यांना ग्रामपंचायत सदस्यपदावरून अपात्र केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aaynode Hivale Kudache Sarpanch Disqualified Sindhudurg Marathi News