कुडाळ टपाल कार्यालयातील अपहाराची आमदार नाईकांकडून दखल

कुडाळ टपाल कार्यालयातील अपहाराची आमदार नाईकांकडून दखल

कुडाळ - येथील पोस्ट गैरव्यवहार पार्श्‍वभूमीवर येत्या सोमवारी एजंटसह त्यांना सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल न झाल्यास चार दिवसानंतर पोस्ट कार्यालय उघडू देणार नाही, असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला. आतापर्यंत सुमारे 72 लाखांचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. 

येथील पोस्ट कार्यालय गैरव्यवहार पार्श्‍वभूमीवर अपहाराचा हा आकडा सुमारे कोट्यवधींच्या घरात पोचलेला आहे. आजही पोस्ट कार्यालयात पासबुक तपासणीसाठी ठेवीदारांनी गर्दी केली होती. पोस्ट कार्यालयाकडून संबंधित एजंटसह कर्मचारीसुद्धा जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी चालढकलपणा होत आहे. आज आमदार नाईक यांनी पोस्ट कार्यालयात भेट देऊन या पोस्टाचे अधिकारी राणे यांच्याशी चर्चा केली. 

या वेळी आमदार नाईक म्हणाले, ""गोरगरीब जनतेने पोस्टावर विश्‍वास ठेवून मोठ्या प्रमाणात पैसा ठेवला आहे. आज या पोस्ट कार्यालयात मोठा अपहार झाला आहे. यामध्ये जे कोण गुंतलेले असतील त्यांच्यावर तत्काळ कारवाई आवश्‍यक आहे. केवळ एजंटच जबाबदार नाहीत तर संबंधित कर्मचारी, अधिकारी जो कोण दोषी असेल त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. ही कारवाई सोमवारपर्यंत करा. गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया न झाल्यास चार दिवसानंतर कुडाळ पोस्ट कार्यालय उघडू देणार नाही.'' 

याप्रसंगी पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी सुद्धा पोस्ट कार्यालयाला भेट दिली. आमदार नाईक यांनी त्यांच्याशी संबंधित जे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करावी, असे सूचित केले.

या वेळी कुडाळ-मालवण विधानसभा महिला संपर्कप्रमुख सुचिता चिंदरकर, महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, तालुका महिला संघटना स्नेहा दळवी, तालुकाप्रमुख राजन नाईक, नगरसेवक प्रज्ञा राणे, सचिन काळप, श्रेया गवंडे, युवा सेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, बबन बोभाटे, संजय भोगटे, राजू गवंडे, संदीप म्हाडेश्वर, सुनील वेंगुर्लेकर, सुभाष परब आदी उपस्थित होते. खासदार विनायक राऊत यांनी सुद्धा या अपहारची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत त्यांनी योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

सखोल चौकशी व्हावी 
एजंटनी पोस्टाचा पैसा अन्य कुठे वापरला? कुठे गुंतवणूक केली? कोणाला दिले? याचीही सखोल चौकशी होणे आवश्‍यक आहे. तपास चुकीच्या पद्धतीने होता कामा नये. गोरगरिबांचा पैसा हा गोरगरिबांना मिळालाच पाहिजे, असे आमदार नाईक यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com