टायर फुटल्याने टेम्पो उलटला, नऊ जखमी, एक गंभीर

तुषार सावंत
Monday, 22 February 2021

शहरालगत जानवली नदीच्या पूलावर आला असता टेम्पोचा मागील टायर फुटला. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. टेम्पो पुलाच्या कठड्याखाली आठ फूट उलटला.

कणकवली (सिंधुदुर्ग) - मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोचा मागील टायर फुटल्याने आज येथे मोठा अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी अपघातात मुंबईतील केटरिंग व्यवसायात काम करणारे नऊजण जखमी झाले. त्यातील एक गंभीर आहे. अपघात सायंकाळी सहाच्या दरम्यान महामार्गावरील जानवली पुलालगत झाला. 

येथील उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार झाले. अपघातामुळे काही काळ वाहतूकीवर परिणाम झाला होता. एका केटरिंग कंपनीचा टेम्पो (एम. एच. 48- एजी 7030) मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. शहरालगत जानवली नदीच्या पूलावर आला असता टेम्पोचा मागील टायर फुटला. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. टेम्पो पुलाच्या कठड्याखाली आठ फूट उलटला.

गोवा येथे केटरिंगचे काम करण्यासाठी टेम्पोतील कामगार शनिवारी (ता.20) रात्री अकरा वाजता मुंबईतून निघाले होते. अपघातापुर्वी एकतास जेवणासाठी थांबले होते. अपघात झाला तेंव्हा टेम्पोच्या हौद्यातील कामगार झोपेत होते. टेम्पोमध्ये केटरिंग साहित्यासह गॅस सिलिंडरही होता. टायर फुटल्याचा मोठा आवज झाला आणि कही क्षणात टेम्पो उलटला. त्यात बसलेल्या 16 कामगारांनी एकच आरडाओरड सुरू केली. आजूबाजूचे लोक आणि वाहनचालकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी जखमींना रस्त्यावर आणले. मिळेल त्या वाहनाने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

एक गंभीर जखमी 
या अपघातात मनोज बिकारामनी चौधरी (वय 38) याला गंभीर दुखापत झाली होती. प्रकाश धीरज राऊत, संजय सुखराम गौतम, रितेश सतिश खन्ना, ओमप्रकाश शिवनाथ गुप्ता, अहमद पुनाशमजी, कैलाश पकारामनी, सोनू मरेशिया, मन्नाराम चौधरी यांना किरकोळ दुखापत झाली. माहिती मिळाल्यानंतर अर्धा तासाने पोलिस उपनिरीक्षक अनमोल रावराणे, जगदीश बांगर आदींचे पथक दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत केली. शिवसेचे कार्यकर्ता अस्मिता तळेकर यांनी जखमींना उपचारासाठी सहकार्य केले. कोळशीचे माजी सरपंच सुशील इंदप यांनी जखमींना रिक्षातून रुग्णालयात नेले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident 9 injured janvali kankavli sindhudurg