....तर त्या जहाजाची मोठी दुर्घटना टळली असती

संदेश पटवर्धन
Wednesday, 9 September 2020

नुकसानाची भरपाई किंवा तातडीच्या मदतीकरिता कोणत्याच संबंधित खात्याकडून सहकार्य होत नाही.

हर्णै : हवामान खात्याकडून 7 तारखेला हवामान खराब होण्यासंदर्भात मिळालेला संदेश 6 तारखेला मिळाला असता तर 6 तारखेच्या रात्री झालेल्या वादळामध्ये आमच्या मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले नसते. या वादळाची हवामान खात्याकडून कोणतीही पूर्वसूचना मिळाली नव्हती. हवामान खात्याने आधीच वादळाचा संदेश दिला असता म्हणजे नौकामालकांनी आपल्या नौका थेट आंजर्ले खाडीत सुरक्षेसाठी नेल्या असत्या. हा मोठा अपघात टळला असता. सूचना नसल्याने अधिक हानी झाली, अशी खंत येथील हर्णै बंदर मच्छीमार कमिटीचे संघटनेचे सदस्य महेंद्र चोगले यांनी व्यक्त केली. 

हेही वाचा -  रत्नागिरीत हे तालुके बनत आहेत कोरोना हॉटस्पॉट 

नुकसानाची भरपाई किंवा तातडीच्या मदतीकरिता कोणत्याच संबंधित खात्याकडून सहकार्य होत नाही. 6 सप्टेंबरच्या रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अचानक हर्णै बंदरात दक्षिण दिशेकडून चक्रीवादळ घुसले. वार्‍याचा वेग प्रचंड होता. मुसळधार पाऊसही पडत होता. त्यामुळे येथील मच्छीमारांची तारांबळ उडाली होती. प्रत्येकाची आपली नौका कशी वाचवता येईल याची घालमेल चालली होती. 

बंदरात मासेमारीकरिता जाण्यासाठी आलेल्या नौका जवळजवळ उभ्या असल्यामुळे एकमेकांवर आदळत होत्या. त्यातच चालक महेश रघुवीर यांच्या नौकेला आदळून फुटल्यामुळे वेगाने पाणी शिरून जलसमाधी मिळाली. त्यामध्ये त्यांचे मासेमारीला लागणारे सर्व सामान समुद्रात वाहून गेले. नौकेवरील सामान वाचवण्यासाठी मच्छीमारांचे अथक प्रयत्न सुरू होते, परंतु काहीही हातास लागले नाही. मत्स्य खात्याकडून मत्स्य परवाना अधिकारी दीप्ती साळवी आणि हर्णै तलाठी अमित शिगवण यांनी पंचनामा केला. परंतु तातडीची कोणतीही मदत मिळेल असे काहीही सांगितले नाही.

दिवसभर कडकडीत उन्हाचे चटके

अनंत चतुर्दशीनंतर मासेमारीला जायचे म्हणून मच्छीमारांची तयारी सुरू होती. त्यात पावसाने दडी मारल्यामुळे मासेमारीला जायला मच्छीमारांना दिलासा मिळाला होता. 6 तारखेला पूर्ण दिवसभर कडकडीत उन्हाचे चटके मारत होते. दिवसभराच्या वातावरणात कोणताही असा बदल दिसून आला नाही की, रात्री एवढे नुकसानकारक चक्रीवादळ होईल.

हेही वाचा - यंदाचा पाऊस कोकणासाठी लय भारी ! डोलू लागल्या भाताच्या लोंब्या

अंदाजावर मच्छीमारांचा विश्वास 

7 तारखेस हवामान खात्याकडून समुद्रामध्ये जाऊ नये. समुद्रामध्ये गेलेले असतील त्यांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी किंवा बंदरात यावे, असा संदेश दिला. हवामान खात्याकडून वातावरणाबाबत अंदाज वर्तवल्यावर मच्छीमार विश्वास ठेवून नेहमीच सतर्क असतात, असे चोगले यांनी सांगितले.

 

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident of boat for yesterday in see was avert when the message was done by administration in ratnagiri